पुणे : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पराभवाला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची महायुतीवर बहिष्कार टाकण्याची भूमिकाही कारणीभूत असल्याचा दावा माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे इथून उमेदवार होते.
भारतीय रिपब्लिकन पक्षाची (आठवले गट) भारतीय जनता पक्षाबरोबर युती आहे. ते महायुतीमध्येही होते. मात्र लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपामध्ये त्यांनी आरपीआयबरोबर साधी चर्चाही केली नाही. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या १२ जागांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यांचा सन्मान ठेवला नाही. त्यामुळे ‘आरपीआय’चे पुण्यातील माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे तसेच आंबेडकरी चळवळीतील अन्य अनेक कार्यकर्त्यांनी महायुतीला मतदान करणार नाही अशी भूमिका घेतली. खुद्द रामदास आठवले यांनी सांगितल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका मागे घेतली नाही. त्यामुळेच वडगाव शेरी मतदारसंघात विद्यमान आमदार असूनही टिंगरे यांना पराभव पत्कारावा लागल्याचा दावा डाॅ. धेंडे यांनी केला.
पुण्याच्या वडगाव शेरी मतदार संघातून शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी झाली आहेत. अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा पराभव करत पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली. बापू पठारे अवघ्या 5000 मतांनी विजयी झाले. टिंगरे यांना पोर्शे कार अपघात प्रकरण नडणार की त्यांनी केलेली विकासकामे त्यांना तारणार? असे सवाल उपस्थित होऊ लागले होते. अशातच धेंडेंच्या दाव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
टिंगरे २०१९ चे विजयी उमेदवार
वडगाव शेरी मतदार संघातून सुनील टिंगरे २०१९ साली निवडून आले होते. त्याठिकाणी बापू पठारे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. बापू पठारे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ३० ते ४० हजारांच्या फरकाने निवडून आले होते. तर २०१४ ला तिसऱ्या नंबरवर राहून पराभूत झाले होते. २०१९ मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. तेव्हा टिंगरे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते.