इंदापूर : लोकसभा निवडणुकीत झोंबलेल्या अपयशानंतर तत्काळ धडा घेत महायुतीने लाडकी बहीण योजना राबवली. या योजनेचा इतका मोठा परिणाम झाला की, भावासाठी लाडक्या बहिणींनी ही निवडणूक हातात घेतली. इंदापूर विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या १ लाख ५६ हजार ४६ होती.त्यानंतर निवडणुकीपूर्वी महिला मतदारांची संख्या तब्बल १० हजार ५८५ ने वाढून १ लाख ६६ हजार ६३१ पर्यंत पोहोचली. या नव्या-जुन्या महिला मतदारांनीच इंदापूर विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार आ. दत्तात्रय भरणे यांना विजयाची हॅट्ट्रिक मिळवून दिली.लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्यावेळी इंदापूर तालुक्यात राजकीय पक्षांचे तुकडे पडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार व अजित पवार या दोन गटांत शकले पडली होती. शरद पवार यांचे सोबती असणाऱ्या प्रवीण माने यांनी प्रथमतः खा. सुप्रिया सुळे यांचा व नंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता. त्याच काळात अजित पवार, हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने व प्रदीप गारटकर हे सर्वजण शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार करत होते.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला जोराचा फटका बसला. या फटक्यामुळे नजीक असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असे काही होऊ नये यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणीही सुरू केली. या योजनेच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी विरोधक असणा-या महाविकास आघाडीने ही योजना नियोजनशून्य आहे.शासनाचा मोठा निधी त्यासाठी वापरात येणार आहे. इतर योजना चालवण्यामध्ये अडचणी येतील. ही योजना फार काळ चालणार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर ही गुंडाळली जाईल, अशा प्रचारास सुरुवात केली. मात्र, कितीही वाद-प्रवाद होत राहिले तरी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधीपर्यंत या योजनेअंतर्गत मिळणारा १५०० रुपयांचा निधी महिलांच्या खात्यावर पडतच राहिला. ही राजकीय विरोधकांकडून दुर्लक्षित राहिलेली बाब महिला मतदारांनी पक्की डोक्यात ठेवली. ती किती पक्की होती हे विधानसभा निवडणुकीच्या निकालात सूर्यप्रकाशासारखी लख्खपणे दिसून आली.पुरुष-महिला मतदारांच्या आकडेवारीत १० हजार मतांची तफावतइंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीस एकूण ३ लाख ४१ हजार ४८५ मतदार सामोरे जाणार होते. त्यामध्ये १ लाख ७४ हजार ८३२ पुरुष, १ लाख ६६ हजार ६३१ महिला व २२ इतर मतदारांचा समावेश होता. प्रत्यक्षात २ लाख ६२हजार ६३४ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये १ लाख ३६ हजार ४११ पुरुष, १ लाख २६ हजार २१२ महिला व ११ इतर मतदारांचा समावेश होता.४० हजार ४१९ महिला मतदारांनी मतदान केले नाही. मात्र झालेल्या मतदानात पुरुष व महिला मतदारांच्या आकडेवारी केवळ १० हजार २०२ एवढ्या मतांची तफावत होती. या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये एवढी कमी तफावत क्वचित आढळली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणत्या पक्षांना, त्यांच्या घोषणांना, कोणत्या मतदारांना कोणी कमी लेखू नये, हा धडा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना मिळाला आहे.
बहिणींच्या भक्कम साथीने भावाने मारले मैदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 9:37 AM