पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपी बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलावरील गुन्ह्याक भादंवि कलम १८५ वाढविले आहे. येरवडा पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून बाल न्याय मंडळाने पोलिसांच्या फेरविचार याचिकेवर आज सुनावणी ठेवली आहे.
यामुळे पोलिसांनी आरोपी बिल्डर पुत्राला आज न्यायालयात हजर राहण्याची सूचना दिली आहे. यापूर्वी पोलिसांनी बिल्डरपुत्रावर 304 हे कलम लावले होते. यामुळे त्याला सहज जामीन मिळाला होता. याचबरोबर पोलिसांनी एमव्ही अॅक्ट १८४ कलम लावले होते. यामध्ये बेदरकारपणे गाडी चालविणे हा गुन्हा असतो. आता पोलिसांनी यात १८५ कलम वाढविले असून नशेच्या अंमलाखाली वाहन चालविल्याचाही गुन्हा दाखल केला आहे.
पुणे पोलिसांनी सांगितल्यानुसार अल्पवयीन आरोपीला याची नोटीसही पाठविण्यात आली आहे. यामध्ये बुधवारी बाल न्याय मंडळासमोर हजर होण्यास सांगितले आहे. आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी देखील याची पुष्टी केली आहे.
पोलिसांनी बाल न्यायालयाच्या आदेशाला वरच्या कोर्टात आव्हान दिले होते. या कोर्टाने पोलिसांना पुन्हा बाल न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. तसेच आदेशामध्ये सुधारणा करण्यासाठी याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. जर बाल न्यायालयाने त्यांच्या आदेशाची समिक्षा केली नाही तर आमच्याकडे या, असे सांगितल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आज काय होणार...पोलिसांनी रिव्हू पिटीशन दाखल केली आहे. यामध्ये बिल्डर बाळाला बाल सुधार गृहात पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला निरीक्षण गृहात किंवा रिमांडवर दिले जावे. त्याला त्याच्या आई वडिलांच्या निरीक्षणाखाली पाठविण्यात येऊ नये, कारण ते त्याच्यावर नजर ठेवण्यात अपयशी ठरले आहेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या मुद्द्यांवर आज सुनावणी होणार आहे. पोलिसांनी बाल न्याय कायद्यांतर्गत एफआयआरमधील कलम 75 (दुर्लक्ष) आणि 77 (मादक पदार्थ देणे किंवा प्रवेश करणे) यांचाही उल्लेख केला आहे.