पुणे : सर्वसाधारणपणे ५० ते ५२ टक्क्यांच्या पुढे न जाणारे कसबा मतदारसंघातील मतदान यावेळी थेट ५९.२६ टक्क्यांवर गेले आहे. इथली लढत प्रामुख्याने महायुतीचे हेमंत रासने विरुद्ध महाआघाडीचे रवींद्र थंगेकर यांच्यात झाली. काँग्रेसच्या बंडखोर आणि अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या कमला व्यवहारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोकरे किती मते घेतील, ती मते कोणाची असतील? हा प्रश्न आता मर्यादित स्वरूपात शिल्लक आहे.
दोन लाख ८३ हजार ६३५ मतदारांपैकी तब्बल एक लाख ६८ हजार ९१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यातही पुन्हा ८२ हजार १०५ महिला आहेत, पुरुष मतदार आहेत ८५ हजार ९७१, म्हणजे महिलांनी पुरुषांच्या जवळपास बरोबरीने मतदान केले आहे. हे मतदान लाडक्या बहिणींचे आहे का? ही बाब निकालानंतर उघड होईल.वाढलेले मतदान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रबोधन मोहिमेमुळे वाढलेले असेल आणि आम्ही पक्षविरहित व फक्त मतदान वाढीसाठी मोहीम राबवली, असे ते कितीही सांगत असले तरीही ते मतदान कोणाला झाले असेल हे कोणीही सांगू शकेल. धंगेकर हे थेट ग्राऊंडवर असतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ते कार्यालयात बसून काम करण्याऐवजी कार्यकर्त्यांमध्ये बसून काम करतात. रासने यांचे वैशिष्ट्य असे की ते काम समजावून घेतात, मग चर्चा करतात, चिंतन करतात, त्यानंतर कामाला हात घालतात. धंगेकर पहाटेपासून सुरू होतात, तर रासने सकाळचे देवदर्शन झाल्याशिवाय नाही. मतदार बोलत नाहीत; पण पाहत असतात. स्वतःच्या मनाशी काही ठरवत असतात, त्यामुळे दोघांच्या या कार्यशैलीचा मतदारांवर काय परिणाम झाला यावरही विजय अवलंबून आहे.सभा तोट्याचीवाडलेले मतदान हाच कसब्यातील सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. बहुतेकांच्या मते महायुतीसाठी ते फायदेशीर आहे, तर अनेकांना वाटते की धंगेकर यांना त्याचा उपयोग होईल. लोकसभेचा अनुभव लक्षात घेत यावेळी त्यांनी प्रचार मोहीम राबवली. त्यातच प्रचाराच्या आदल्या दिवशी झालेले देवेंद्र फडणवीस यांची सभा त्यांना मतदारसंघाच्या मध्यभागात तोट्याची ठरलीच, तर तीच सभा मतदारसंघाच्या सीमारेषेवर असलेल्या वस्त्या, वसाहतींमध्ये फायदा देणारी असेल, ससून, पोर्शे कार अपघात अशा काही प्रकरणांमध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा फायदा त्यांना होईल का है निकालानंतर समजेल.