कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीवरील पुलाच्या वळणाचा अंदाज न आल्याने रात्री तीन वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार रस्त्यावरून ५० फूट खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन युवक गंभीर जखमी होऊन एक युवक किरकोळ जखमी झाला आहे.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीच्या पुलावरून स्विफ्ट कार मधून एंकेश सिंघल, राजा सिंघ व ऋषिकेश यादव हे तिघे युवक १६ जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे बाजूने अहमदनगर दिशेने चालले होते. कोरेगाव भिमातील भीमा नदीच्या पुलावरून पुढे आल्यानंतर असलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची कार पुलाच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळून पलटी होऊन तब्बल पन्नास फुट लांब कोसळत गेली. दरम्यान कार मधील तिघे युवक कार मध्ये अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार शंकर साळुंके, पोलीस नाईक राकेश मळेकर, प्रफुल्ल सुतार, पोलीस मित्र खंडू चकोर, प्रवीण कोल्हे, मयूर भंडारे यांसह आदी युवकांनी सदर ठिकाणी धाव घेतली असता एका युवकाची मान कारच्या काचेमध्ये अडकलेली असल्याचे दिसून आले. यावेळी कारच्या काचा फोडून तिघा युवकांना बाहेर काढले.
या अपघातात एकांश सिंघल (वय ३० वर्षे) ऋषिकेश यादव (वय ३४ वर्षे दोघे रा. वाघोली ता. शिरुर जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले तर राजा विनायक सिंघ (वय ३९ वर्षे रा. वाघोली ता. शिरुर जि. पुणे) हा युवक किरकोळ जखमी झाला असून त्यांच्यावर शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई प्रफुल्ल कल्याण सुतार रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी कार चालक एकांश सिंघल (वय ३० वर्षे रा. वाघोली ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.