पुणे : मित्रांसह घरी जात असताना काही मुले गोंधळ घालत असल्याचे पाहून थांबल्यावर त्यातील दोघांनी तरुणाचे जबरदस्तीने खिसे तपासले. मात्र, त्याच्या खिशात काहीही न सापडल्याने त्याच्या पोटात चाकू खुपसून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी कृष्णा रघुनाथ इंगळे (वय २४, रा. बोधनगर, लिंक रोड, पिंपरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चिखली येथे साफसफाईचे काम करतात. ते आपल्या मालकाबरोबर पेरणे फाटा येथे विजयस्तंभाला अभिवादनासाठी गेले होते. तेथे गर्दीत त्यांची चुकामूक झाली. तेव्हा त्यांच्या घराजवळ राहणारे दोघे जण भेटले. त्यांच्याबरोबर मोटरसायकलवरून ते रात्री साडेदहा वाजता घरी परत जात होते. त्यावेळी गुंजन टॉकीज चौकात चार ते पाच जण गोंधळ घालत होते. ते पाहून गाडी बाजूला घेऊन त्याचे ओळखीचे त्या मुलांकडे गेले. त्यावेळी गोंधळ घालणाऱ्या मुलांपैकी दोघांनी फिर्यादी यांचे खिसे तपासले. त्यात काही मिळाले नाही. तेव्हा शिवीगाळ करून एकाने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. त्यांना प्रतिकार करत फिर्यादी स्वत:चा जीव वाचविण्याकरिता अंधारात पळत जाऊन तबेल्यात लपले. चाकू खुपसला तेथून खूप रक्तस्त्राव होत होता. काही वेळ थांबून ते तेथून बाहेर आले. तेव्हा रस्त्यावर गोंधळ घालणारे दिसून आले नाही. तेव्हा ते रस्ता ओलांडून पलीकडे गेले; परंतु, त्यांना ग्लानी आल्याने ते तेथेच पडले. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर ते कसेबसे चालत गेले. तेव्हा त्यांना समोरच पोलिस स्टेशन दिसले. पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. ससूनमध्ये डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली असून पोलिस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.