पुणे : केतकी चितळेने राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, बीड, औरंगबाद अशा अनेक जिल्ह्यात तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनीकेतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. न्यायालयात लवकरच चितळेबाबत सुनावणी होणार आहे. त्यातच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांकडून केतकी चितळेवर निशाणा साधला जात आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टचा निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांनीसुद्धा याबाबत निषेध व्यक्त केला होता.
''यावेळी आपण कोण केतकी चितळे तिला ओळखतही नाही असं म्हणत अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या मरणाबाबत भाष्य करण्याची संस्कृती नाही. असं म्हणत केतकी चितळे हिच्या कृतीला फारसं महत्त्व दिलेलं नाही.'' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केतकी चितळेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. या घटनेवर भाष्य करता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. सुप्रियाताई कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण वाढवतानाच दिसत असल्याची टीका देसाई यांनी केली आहे.
देसाई म्हणाल्या, केतकी चितळेच्या वयाचा विचार करता या सर्व गोष्टी संपवायला हव्यात. पवार साहेब मोठे नेते आहेत असे म्हणणाऱ्या पंकजाताई मुंडे किती अभ्यासू आहेत. ते कळतंय परंतु दुसरी बाजू पाहता पवारसाहेबांच्या कन्या सुप्रियाताई मात्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण वाढवतानाच दिसत आहेत. सुप्रियाताईंनी स्वतःहून अशी सामंजस्याची भूमिका घेतली असती. तर नक्कीच सर्वसामान्यांच्या मनात त्यांना अजून आदराचे स्थान वाढले असते. पंकजाताईंनी एक महिला म्हणून एका महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो दाखवला आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात अजूनच आदर वाढला आहे.