पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधींची ॲपेंडिक्सची शस्त्रक्रिया १२ जानेवारी १९२४ रोजी ससून रुग्णालयात झाली होती. त्या शस्त्रक्रियेला आज ९९ वर्षे पूर्ण झाली. शताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त ससून रुग्णालयातील डेव्हिड ससून इमारतीमध्ये शस्त्रक्रिया झालेला कक्ष व इमारत वारसा स्वरूपात जतन करून ठेवली आहे. परंतु, हा कक्ष सर्वसामान्यांसाठी खुला केलेला नाही.
पुण्याच्या येरवडा कारागृहात राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असताना महात्मा गांधींना ससून रुग्णालयात दाखल केले हाेते. तेथे त्यांच्यावर ॲपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्या कक्षाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला. या ऐतिहासिक घटनेचा आजपासून शताब्दी वर्ष सुरू हाेत आहे.
दरवर्षी ससून सर्वोपचार रुग्णालयातील शस्त्रक्रिया झालेले महात्मा गांधी स्मारक हे गांधी जयंती दिवशी २ ऑक्टोबर रोजी आणि गांधी पुण्यतिथी अर्थात ३० जानेवारी राेजी दिवशी खुले ठेवण्यात येते. ही इमारत वारसा स्थळ म्हणून जतन केली आहे. ते स्मारक सर्वसामान्यांसाठी उघडण्यात यावे, अशी मागणी हाेत आहे.
कंदिलाच्या प्रकाशात शस्त्रक्रिया
महात्मा गांधी यांच्यावर १२ जानेवारी रोजी सिव्हिल सर्जन कर्नल मेडॉक यांनी ॲपेंडिक्सची शस्त्रक्रिया केली. ती सुरू असताना विद्युतप्रवाह मध्येच बंद पडला होता. त्यानंतर कंदिलाच्या प्रकाशात शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली.
ते टेबलही जतन
ससून रुग्णालयातील महात्मा गांधी यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या कक्षात त्यांचे शस्त्रक्रियाचे टेबल, कात्री व इतर वस्तू आहेत. तसेच गांधीजींनी मेडॉक यांना लिहिलेले पत्र गांधीजींच्या प्रकृतीसंबंधीचे जेल सुपरिटेंडंट यांचे अहवाल, शस्त्रक्रिया झाल्यादिवशीची ऑपरेशन थिएटरची यादी उपोषण यासंबंधीची वर्तमानपत्रातील कात्रणे आणि शस्त्रक्रियेदरम्यानचे फोटो जतन करून ठेवले आहे.