बारामती (पुणे) : मराठवाड्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव निवळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र बसून मार्ग काढावा. विशेषत: केंद्र सरकारने यात पुढाकार घ्यावा. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल. सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची जबाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही यात राजकारण आणणार नाही. पण केंद्राला यात बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असे आव्हान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिले आहे.
पवार हे गेल्या तीन दिवसांपासून बारामतीत दुष्काळ दौऱ्यावर आहेत. आजचा तिसरा दिवस आहे. तत्पूर्वी पवार पत्रकारांशी बोलत होते. मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण आंदोलन सुरू आहे, तसेच त्याविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचेही उपोषण सुरू आहे. या उपोषणांसदर्भात यावेळी शरद पवार म्हणाले, जरांगेंनी इतकी उपोषणे केली तरी त्यांचा प्रश्न कुठे सुटला आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा. मराठवाड्यात सामाजिक तणाव वाढू नये, याची सर्वांनीच काळजी घ्यावी. दोन्ही समाजांनी शांतता राखावी, सरकारने आरक्षणाचा तिढा सामजस्याने सोडवावा. सामाजिक तणाव वाढू नये, यासाठी आमचे सहकार्य असेल, असेदेखील पवार यांनी नमूद केले.
दुष्काळी भागाला न्याय देणाऱ्या जानाई, पुरंदर उपसा सिंचन या योजना आहेत. या योजनांना माझ्या सहीने मान्यता देऊन फार वर्ष झाली. यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक धोरणात्मक बाबींवर राज्य सरकार निर्णय घेते. या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक बोलवावी, यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र देत विनंती करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. दाैऱ्यात बारामती, इंदापूर, दाैंड, पुरंदरचे प्रश्न समजले. या प्रश्नाबाबतदेखील मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यात येईल. त्यासाठी अनुकूल निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून दूधधंदा महत्त्वाचा आहे. मात्र, त्यासाठी दूध उत्पादन खर्च आणि विक्री किंमत याचा मेळ काही बसत नाही. राज्य शासनाने वाढविलेला ५ रुपये दर काही लोकांना मिळालेला नाही. त्यामुळे ५ रुपये दर वाढवून दूधधंदा परवडेल अशा स्थितीत आणावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे पवार म्हणाले.
भाजप आणि मोदी सरकारबद्दल लोकांच्या मनात असणाऱ्या विश्वासाला तडा बसला. मोदी की गॅरंटी, असे मोदी सतत सांगत. पण त्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास नसल्याचे या लोकसभा निवडणूक निकालात स्पष्ट झाल्याचा टोला पवार यांनी लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा लोकसभेला वाढल्या. त्यामागे मोदींबद्दल नाराजी आहे. असल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणुकीत आम्ही ३१ जागा जिंकल्या, त्यानुसार तर विधानसभेच्या १५५ मतदारसंघात आमच्या लोकांचा विजय झाला होता. आता विधानसभेत लोकांचा मुड दिसेल, असे पवार म्हणाले. राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, एक व्यक्तिगत हल्ले आणि अपघात राज्यात वाढले आहे. राज्य सरकारचं कायदा आणि सुव्यवस्थाबद्दल नियंत्रण हवं ते दिसत नसल्याचे ते म्हणाले.