पुणे : केंद्रीय निवडणूक आयोग पूर्वग्रहदूषित असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. आमच्यातील फूट हा वाद नसताना आयोगाने तसा वाद असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत वकिलांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ अशी माहिती पाटील यांनी दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या त्रैमासिक बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येत्या सहा ऑक्टोबरला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासंदर्भात निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी ठेवली असून याबाबत नाहक वाद निर्माण झाल्याची खंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. मुळात हा वाद नाही, असे आयोगाला कळविले होते. मात्र, आमची बाजू न ऐकता आयोगाने हा वाद असल्याचे सांगून सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे पुढील भूमिका ठरविण्यासाठी वकिलांशी सल्लामसलत करत आहोत, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या राज्यातल्या विविध भागांमध्ये सभा घेत आहेत. त्यासोबतच महाविकास आघाडी देखील वज्रमूठ सभा आयोजित करत आहे. आघाडीची पुढील वज्रमूठ सभा ठाण्यात होऊ शकते, अशी शक्यता पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र, अजून त्याबाबत नक्की ठरलेले नाही. यासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत निर्णय घेतील स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शरद पवार हे पुढील काही दिवसात मंचर येथे सभा घेणार असल्याचे बोलले जात होते, या संदर्भात पाटील यांनी अशी कोणतीही सभा जिल्ह्यात अद्याप ठरलेली नसल्याचे स्पष्ट केले.
राज्य सरकार कंत्राटी पद्धतीने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना नेमणार असल्याचे असल्याचा निर्णयावर पाटील यांनी यावेळी सडकून टीका केली. जबाबदारी असलेले पदे कंत्राटी पद्धतीने भरू नये. त्यांच्याकडून चुका होऊ शकतात त्याचा अंतिम भुर्दंड हा जनतेलाच बसू शकतो अत्यंत गरजेच्या ठिकाणीच कंत्राटी पद्धतीने भरती करावी त्यालाही मर्यादा असाव्यात. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या कंपन्याच या भरतीत सामील असल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोयीच्या लोकांना पुसण्यासाठीच व त्यांना आर्थिक लाभ देण्याचा हा प्रयत्न गंभीर असल्याचा आरोप सरकारवर केला. विरोधी पक्ष यासंदर्भात हळूहळू भूमिका मांडेल असेही ते यावेळी म्हणाले.