पुणे : काहीही करून केंद्र सरकारला महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, त्यांचे सगळे कपटकारस्थान त्यासाठी सुरू आहे, केंद्र सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी वाटेल तसे निर्णय घेताहेत. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या पटोले यांनी त्या कार्यक्रमाआधी पत्रकारांबरोबर संवाद साधला.
पटोले म्हणाले, केंद्र सरकारला प्रत्येक आघाडीवर अपयश येते आहे. त्याशिवाय सामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी वाटेल तसे निर्णय ते घेत आहेत. हे पाप लपवण्यासाठी म्हणून त्यांना सगळीकडे त्यांचीच सत्ता हवी आहे. त्यासाठीच ते महाराष्ट्र अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र महाराष्ट्र याला बळी पडणार नाही.
भाजपाच्या नेेत्यांनी अलीकडेच सन २०१७ ला आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर मान्य करायला हवी होती असे वक्तव्य केले आहे याकडे पटोले यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ते कोणाचे नाव घेतात ते त्यांनांच माहिती, त्यावेळी त्यांच्यात काय घटत होते ते आम्हाला कसे समजणार? आम्हाला दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय नाही. आमच्यासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधी जे सांगतील तेच महत्वाचे आहे.राजकारणात कोणीही कोणाचे कायमचे शत्रू किंवा कायमचे मित्र नसतात असंही पटोले यावेळी म्हणाले आहेत.