मंचर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी समजलाच नाही. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून केंद्र सरकार शेतकरी संपविण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष पार पाडणार असून त्यासाठी तीन तारखेपासून राज्यभर पदयात्रा केली जाणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
मंचर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कार्पोरेट सेक्टरला फास लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. घटना दुरुस्ती करत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना लुटण्यासाठी जीएसटी व्यवस्था आणली आहे .केंद्राने आर्थिक धोरण आखून जीएसटी कर आणला. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसतो आहे. बँकांनाही जीएसटी भरावा लागत असून जर जीएसटी भरला नाही तर केंद्र सरकार दंड न करता मनी लॉन्ड्री केस लावते आणि ईडीचा ससेमीरा मागे लावला जातो. असे सांगून पटोले पुढे म्हणाले, केंद्र सरकार शेतकरी संपवण्याचा प्रयत्न करत आहे. कांदा तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. त्यांना अक्षरशा माल फेकून द्यावा लागत आहे. सरकारची धोरणे याला कारणीभूत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकरी समजलेलाच नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी आहे. सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी तीन ते बारा तारखेदरम्यान राज्यात पदयात्रा काढली जाणार आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले तसेच खोटे गुन्हे दाखल होण्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवणार आहे.याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. मागणी करूनही सरकारने चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. सरकार याबाबत गंभीर नसल्याचे ते म्हणाले.