पुणे: आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) गेले नाहीत. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीत ना आल्याचा उल्लेखही त्यांनी बारामतीत केला. त्यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. आम्हाला जरांगे पाटील आणि सरकार यांच्यात काय चर्चा झाली हे माहित नव्हतं. तसेच दुसऱ्या बाजूने ओबीसींना जी कमिटमेंट केली त्याची माहिती नव्हती. म्हणून आम्ही बैठकीला गेलो नसल्यचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पवार म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीला मी गेलो नाही. त्याची दोन कारणे होती. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मनोज जरांगेचं उपोषण सुरू होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांचा संवाद काय झाला माहीत नाही. त्यानंतर उपोषण सुटलं. त्यानंतर जरांगे पाटील यांची नवी मुंबईत एक संयुक्त कार्यक्रम पाहिला. याचा अर्थ काही तरी त्यांच्यात संवाद होता. तो आम्हाला माहीत नव्हता. दुसरीकडे ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू होतं. तिथे राज्य सरकारचे मंत्री गेले. त्यांचं काय बोलणं झालं माहीत नव्हतं. त्यांच्यातील सुसंवाद माहीत नव्हता. त्यामुळे मिटिंगला न जाण्याचं कारण एकच होतं की, सरकार जरांगे आणि ओबीसीं नेत्यांशी बोलत आहेत. त्यानंतर नेते काही विधानं करत आहेत. पण संवाद काय झाला आणि प्रस्ताव काय होता हे पब्लिकला आणि आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे जरांगे यांना सरकारने काय आश्वासन दिलं याचं वास्तव चित्र आपल्याकडे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जी कमिटमेंट केली त्याची माहिती येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांनी आम्हाला माहिती दिली तरच आम्ही जाऊ शकतो असं ठरवलं. त्यांनी ४०-५० लोकांना बोलावलं आणि चर्चा केली. तिथे मत मांडावं असं योग्य वाटलं नाही असेही शरद पवार यांनी सांगितले.