बारामती : बारामती शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मजुरांच्या दोन मुलांनी राज्य लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. बारामतीकरांनी शहराच्या मुख्य रस्त्यावरून त्या दोघांची घोड्यावरुन मिरवणुक काढत आनंद व्यक्त केला.
कोणतेहि यश मिळविण्यासाठी तुमची जिद्ध आणि प्रयत्न हे जर प्रामाणिक असावे लागते. त्यानंतरच मिळालेलं यश नक्कीच अफाट असत. याचा आदर्श वस्तुपाठच या दोघांनी मांडला आहे. शहरातील आमराई मधील सुरज सुभाष मोरे आणि शुभम मिलिंद शिंदे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे हि अतिशय सामान्य कुटुंबातील आहेत. सुरज चे वडील हे सेंट्रिंगचे काम करतात, तर शुभमचे वडील हे गॅरेज मध्ये कामाला आहेत. कुटुंबांची परिस्थिती बेताची असताना देखील या दोघांनी बुद्धी कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. तसेच आमराईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.त्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे.
या दोघांच्या यशानंतर आमराई परिसरातील शेकडो नागरिकांनी फटक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण केली. त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. इतके वर्षे जी लोक बारामतीतील आमराई परिसराकडे वाईट दृष्टीकोनातून बघत होती. त्या लोकांसाठी सुरज आणि शुभम चे यश हे सणसणीत चपराक असल्याची भावना काल आमराई परिसरातील प्रत्येक नागरिकांच्या मनात होती.
...बाबासाहेबांचे विचार आणि आई-वडील हीच प्रेरणा
''भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आणि आई-वडिलांची प्रेरणा या मुळेच आम्ही आज या उंची पर्यंत येऊन पोहचलो, असे सुरज आणि शुभम यांनी सांगितले. आमच्या दोघांची हि जबाबदारी अधिक वाढली आहे. येत्या काळात आमराई परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टया सक्षम करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे ते म्हणाले.''