पुणे : पाच वर्षांपूर्वी पतीचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर सासू व सुनेमध्ये वादविवाद सुरू झाले. या वादाला कंटाळून ती विधवा सून माहेरी परतली आणि मुले पतीच्या आईकडे म्हणजे आजीकडेच राहिली. मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. परंतु मुलांनी ’आई’ नको ’आजी’ हवी असे सांगितल्याने मुलांच्या कल्याणाच्या दृष्टीने व त्यांच्या योग्य व निकोप वाढीसाठी त्यांना आजीकडे ठेवणे योग्य होईल असा निर्वाळा कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी दिला. मात्र, आईला भेटणे हा मुलांचा नैसर्गिक अधिकार आहे म्हणून पंधरा दिवसातून एकदा कौटुंबिक न्यायालयाच्या बाल संकुलामध्ये दोन तासासाठी आईला मुलांना भेटता येणार आहे. तसेच उन्हाळी, हिवाळी व दिवाळीच्या सुट्टीमध्ये आईला मुले आपल्या घरी नेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पती आणि पत्नीचा सुखी संसार सुरू असताना पतीचा अनैसर्गिक मृत्यू झाला. त्यामुळे सासू व सूने मध्ये दुरावा निर्माण झाला. दोघांना तीन अज्ञान मुले आहेत. त्यांच्या ताब्याविषयी चा वाद कौटुंबिक न्यायालयात दाखल झाला. सुनेचे म्हणणे होते की ती छोटा व्यवसाय करून पैसा कमावते. त्यामुळे मुलांचा सांभाळ करण्यास समर्थ आहे. सासुच्या म्हणण्यानुसार, ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकरी करते. तिने आजपर्यंत मुलांच्या शिक्षणाचा पालनपोषण व औषध उपचाराचा खर्च केलेला आहे.
न्यायालयाने 15 वर्षीय मुलीची साक्ष नोंदविली. त्यामध्ये तिने आजीकडेच राहाण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच इतर दोन मुलांशी समुपदेशकाने संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या आजीकडे रहायचे आहे. न्यायालयाने मुलांच्या इच्छेचा विचार केला. तसेच आजीने मागील पाच वषार्पासून त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती तसेच आजीने त्यांच्या शिक्षणाची ही योग्य काळजी घेतली होती. मुलांच्या भविष्याचा व कल्याणाचा विचार करून न्यायालयाने मुलांचा ताबा आजीकडे ठेवला.