पुणे : उन्हाळी सुटीनंतर दीड महिन्याने शहरातील महापालिकेच्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक आणि खासगी अनुदानित शाळांची पहिली घंटा आज, गुरुवारी (दि. १५) वाजणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी जय्यत तयारी केली असून, कुठे फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या, तर कुठे ढोल-ताशांच्या गजरात अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात आहे.
एकीकडे पूर्वप्राथमिक शाळांमध्ये चिमुकल्यांची किलबिल... नवीन दप्तर... शाळेच्या दरवाजात प्रवेश करताना थोडीशी भीती... हुरहुर असणारी लहान मुले, तर दुसरीकडे प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मित्र-मैत्रिणींना भेटण्याची लागलेली ओढ, मजा मस्ती... असे काहीसे चित्र शाळांमध्ये पाहायला मिळणार आहे.राज्य शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी पहिली ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्याचा अभिनव प्रकल्प राबविला आहे. एकत्रित विषयानुरूप एकात्मिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. वह्यांच्या पानांमध्ये कशाप्रकारच्या नोंदी करायच्या आहेत याच्या सूचना शिक्षकांना बालभारतीकडून देण्यात आल्या आहेत.
दरवर्षी शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केले जाते. यात महापालिकेच्या ३०५ प्राथमिक व माध्यमिक आणि खासगी अनुदानित अशा एकूण ३७७ शाळांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बालभारतीकडून पुस्तके शिक्षण विभागाला मिळतात. त्यानंतर १५ जूनपूर्वी तालुकास्तरावर त्याचे वाटप करून त्या त्या भागातील शाळांना पुस्तके दिली जातात. मात्र, यंदा बालभारतीकडून सर्व विषयांची पुस्तके मिळण्यास काहीसा विलंब झाल्याने शिक्षण विभागाच्या हातात वेळेत पुस्तके पोहोचू शकली नाहीत. त्यामुळे सरासरी ८० टक्केच शाळांना पुस्तकांचे वाटप झाले आहे. यातच वारीमुळे रस्ते बंद राहिल्याने शाळा पुस्तकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत.
नवीन पुस्तकांचा गंध पहिली ते आठवीमधील सर्वच विद्यार्थ्यांना मिळण्याबाबत काहीशी साशंकता आहे. शहरातील काही शाळांना पुस्तकांचे पूर्ण संच मिळाले नसल्याने काही मुले पुस्तकांपासून वंचित राहणार आहेत. शाळांना शासनाला दाखविण्यासाठी का होईना दिखावा म्हणून पुस्तके विद्यार्थ्यांना द्यावी लागणार असली तरी कुणाला पुस्तक द्यायचे आणि कुणाला नाही, असा पेच शिक्षकांसमोर निर्माण होणार आहे.
''शाळेला शंभर टक्के पुस्तके मिळाली नाहीत. विशेषत: इयत्ता पाचवीची दीडशे पुस्तके कमी पडली. प्रशासनाधिकाऱ्यांनी आम्हाला किती पुस्तके कमी पडली याचे पत्र देण्यास सांगितले. येत्या महिन्यात ती पुस्तके देणार असल्याचेही सांगण्यात आले. -पूजा जोग, मुख्याध्यापिका, रेणुका स्वरूप हायस्कूल.''
''पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थिनींना पुस्तके मिळू शकणार नाहीतच, शाळांना पुस्तक वाटपाचा दुसरा टप्पा बुधवारी पार पडला. त्यामुळे आताच आम्ही काही पुस्तके घेऊन आलो आहोत. किती पुस्तके कमी पडताहेत याची आकडेवारी काढण्याचे काम सुरू आहे. -शोभा कांबळे, महिलाश्रम, हायस्कूल.''
''शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केले जाईल. गणवेश आणि इतर शालेय साहित्य वाटपासाठी पालकांच्या खात्यात विशिष्ट रक्कम जमा केली जाते. ती प्रक्रिया उद्या विद्यार्थी शाळेत आल्यावर सुरू होणार आहे.- मीनाक्षी राऊत, शिक्षणाधिकारी प्राथमिक.''
''पालखी नसती तर 14 जूनपर्यंत वाटप पूर्ण झाले असते. बालभारतीकडून 5 ते 6 जूनला सर्व विषयांची पुस्तके मिळाली. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी जेवढ्या शाळांना पुस्तके मिळाली आहेत ती विद्यार्थ्यांना मिळतील. शाळांची पटसंख्या वाढली असेल तर एवढा बॅकलॉग भरता येणार नाही. - मनोरमा आवरे, प्रकल्प अधिकारी समर्थ शिक्षण अभियान.''
पुस्तक वाटप स्थिती
औंध केंद्र : १ लाख ४९ हजार २१८येरवडा : ९४ हजार ९९६बिबवेवाडी : ४६ हजार ३६१हडपसर : १ लाख ९५ हजार ७५६पुणे शहर : ६२ हजार ९८८एकूण : ५ लाख ४९ हजार ३१९