पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे, येत्या गुरुवारी (उद्या) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले होते. पण शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागाच्या वतीने अंतर्गत दुरुस्तीसाठी जाहीर करण्यात आलेले पाणी बंद गुरुवारी सुरळीत राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा होणार आहे. २७ मे रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते तीन कर्तृत्ववान महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दत्तमंदिराचा १२५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘लक्ष्मीदत्त’ कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी शिवराज कदम जहागीरदार, महेंद्र पिसाळ, रजनी उकरंडे, युवराज गाडवे, सुनील रुकारी, डॉ. पराग काळकर, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
महापालिकेच्यावतीने पर्वती गुरुवारी जलकेंद्र पम्पिंग, लष्कर जलकेंद्र पम्पिंग, एस.एन.डी.टी / वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत / पम्पिंग विषयक व स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने, या दिवशी संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली होती.