पुणे: सध्या राज्यामध्ये पावसाचे वातावरण निवळले आहे. त्यामुळे तापमानात चढ-उतार होत आहे. गेल्या आठवडाभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी एकदम गायब झाली होती. उत्तर भारतातील राज्यांमध्येही बहुतांशी ठिकाणी थंडी जाणवली नाही. पुढील काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पुन्हा थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला.
राज्यामध्ये सोमवारपासून (दि.३०) पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत ऊबदार वातावरण हळूहळू कमी होत जाणार आहे. शुक्रवार (दि.३) पासून त्यापुढील पाच दिवसांसाठी म्हणजे मंगळवार, दि. ७ जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवण्याची शक्यता आहे. त्यातही विशेषतः उत्तर महाराष्ट्र व उत्तर विदर्भातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत त्या पाच दिवसांत थंडीचा प्रभाव अधिक राहील. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, असे खुळे यांनी सांगितले.
राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या परिसरापासून उत्तर गुजरातपर्यंत हवेचा कमीदाबाच्या पट्ट्याचीही निर्मिती झाली. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. यामुळे सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी झालेली आहे. मागील आठवडाभरात राज्यात ढगाळ हवामानासह पावसानेदेखील हजेरी लावली होती. मागील तीन दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांत गारपीटही झाली होती, तर पावसानेदेखील पिकांना तडाखा दिला होता. त्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली. उत्तर भारतातूनही थंडी वाऱ्यांचा प्रवाह काहीसा खंडित झाला होता. राज्यात आजही तापमानात चढ-उतार राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच पुढील काही दिवसांत पुन्हा थंडीला सुरुवात होऊ शकते, असेही खुळे म्हणाले.