पुणे : पावसाळा सुरू झाला की त्यापाठोपाठ रस्त्यावर पडणारे खड्डे ही समस्या आलीच! वर्षानुवर्षे हाच अनुभव. जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहराच्या उपनगरांमधील रस्त्यांचे भीषण चित्र पाहता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता आहे, असा प्रश्न पडताे. अशा रस्त्यांवरून ये-जा करताना अनेकांच्या पाेटात खड्डा येता. ‘लोकमत’च्या टीमने रविवारी शहरातील बहुतांश भागात फिरून पाहणी केली असता हे वास्तव दिसले. त्यानंतर ‘जपून जपून जपून जा रे.. पुढे खड्डा आहे’ असेच म्हणावेसे वाटत आहे.
शहरातील सिमेंट काँक्रीटच्या मोठमोठ्या रस्त्यांवरही चौका-चौकात असलेला डांबरीकरणाचा पट्टा पूर्णपणे उखडलेला दिसून येत आहे. उपनगरांमध्येही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवली. अनेक रस्त्यांवर इतके खड्डे आहेत की, त्यांचा क्रम लावणेही मुश्कील झाले आहे. त्यातल्या त्यात आम्ही हा क्रम लावण्याचा प्रयत्न केला आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्याची चाळण
कात्रज-कोंढवा हा बाह्यवळण रस्ता म्हणून विकसित करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात त्याचे डांबरीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले आहे. या संपूर्ण रस्त्याची चाळण झाली असून, वाहनचालकांना चिखलाशीही सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेने जाणाऱ्यांना वाहनांमुळे खड्ड्यांतील पाणी अंगावर झेलावे लागते. रस्त्यावर अनेक ठिकाणी उघडे चेंबर्स, खड्डे दाखविण्यासाठी आडवे उभे केलेले बॅरिकेट्स, रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांच्या ठिकाणी उभी केलेली मोठमोठे दगड, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी एका बाजूने अर्धवट रस्ता खोदल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. गोकुळनगर चौकापासून ते खडी मशीन चौकापर्यंत गाडी कशी चालवावी, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कॅम्प परिसर
विविध कामांसाठी खोदलेल्या किंवा अर्धवट बुजवलेल्या खड्ड्यांमुळे लष्कर भागातील शिवाजी महाराज चौकातून (गोळीबार चौक) खाली एमजी रोड मार्गे सोलापूर रोड, कोंढवा राेड, कोंढव्याहून कॅम्पकडे जाणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. गोळीबार मैदान ते महात्मा बस स्टॉप परिसरात खड्ड्यांमधील माती रस्त्यावर पसरून सर्व परिसर चिखलमय झाला आहे. पाऊस आणि खड्ड्यांमुळे गोळीबार चौक ते सोलापूर बाजार जाण्यासाठी तब्बल एक तास लागतो.
सोलापूर रोड
फातिमा नगर ते हडपसर पुलापर्यंतचा रस्ता पावसामुळे अधिक धोकादायक झाला आहे. फातिमा नगरनंतर क्रोमा शोरूम चौक ते रामटेकडी दरम्यान रस्त्याची साईडपट्टी खड्डेमय झाली असल्यामुळे दुचाकीचालकांना पाठदुखीचा त्रास वाढला आहे. रामटेकडी पूल ओलांडल्यानंतर वैदवाडी चौक परिसरामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या भागात खड्डे दुरुस्तीदेखील तात्पुरती केली जाते. त्यामुळे काही दिवसांनंतर पुन्हा खड्डे पडतात. मगरपट्टा चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
नर्हे रोड
नर्हे येथे जात असताना तुमचे स्वागतच खड्ड्यांनी होते. ग्रामपंचायतीच्या काळात हे रस्ते केले होते. महापालिकेने मधल्या काळात डांबरीकरण केले होते. गावातून महामार्गावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे आतील बाजूच्या रस्त्यांची अवस्था तर कोणी विचारू नये, अशी झाली आहे.
गोळीबार मैदान - शंकरशेठ रोड
कॅंटाेन्मेंटचे कार्यालय असले तरी त्याच्यासमोरच मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अर्ध्यापेक्षा अधिक रस्ता खराब झाला आहे. त्याचा सर्वाधिक त्रास रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
नगर रोड
उन्हाळ्यामध्ये विविध केबल कंपन्या व अन्य कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी नगर रोडवर चौका-चौकांत खोदाई करण्यात आली होती. त्या ठिकाणी तात्पुरता मुरुम टाकून मलमपट्टी केल्याने पहिल्याच पावसात या रस्त्याची स्थिती बिकट झाली आहे. शास्त्रीनगर चौक, रामवाडी चौक, विमाननगर चौक, टाटागार्डरूम चौक, चंदननगर चौक, खराडी बायपास चौक, दर्गा या ठिकाणी केबल पास करण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते. त्याची व्यवस्थित डागडुजी न केल्याने प्रत्येक चौकात खड्डे पडले आहेत.