पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत सुरू झाले आहे, त्याच्या स्वागतासाठी राज्य सरकारने दिलेल्या जाहिरातीतून संमेलनाध्यक्षांचे छायाचित्रच गायब केल्याबद्दल काँग्रेसने सरकारवर टीका केली. सरकारमध्ये औषधालादेखील सभ्यता शिल्लक राहिलेली दिसत नाही असे काँग्रेसने म्हटले आहे.पक्षाचे राज्य प्रवक्ते हनुमंत पवार यांनी यावरून सरकारला टोकले आहे. देशाच्या राजधानीत, म्हणजेच दिल्लीत व एका अर्थाने परराज्यात मराठीजन संमेलनासाठी म्हणून तीन दिवस मुक्काम करणार आहेत. त्यांना राज्य सरकारचा संपूर्ण पाठिंबा आहे हे दर्शवणे सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे त्यासाठी जाहिराती दिल्या हे योग्यच आहे, मात्र संमेलनाच्या स्वागतासाठी म्हणून दिलेल्या या जाहिरातींमधून संमेलनाच्या अध्यक्ष असलेल्या ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांचे छायाचित्रच वगळणे म्हणजे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे आहे असे पवार म्हणाले. डॉ. भवाळकर यांचे छायाचित्र असणे, संमेलनाचे संयोजक, आयोजक असलेल्या संस्थांची नावे देणे योग्य व समयोचितच होते, मात्र त्याचे भान सरकारला राहिले नाही अशी टीका पवार यांनी केली.संमेलनाध्यक्ष नाहीत, मात्र त्याच संमेलनाचे उदघाटक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संत तुकाराम महाराजांच्या वेशभुषेतील छायाचित्र आहे. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस त्याच वेशात आहेत, खालील बाजूस पुन्हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व भाषा विकासमंत्रीही आहेत, फक्त संमेलनाध्यक्ष मात्र नाहीत हे अयोग्य व सत्ता आमचीच, आम्ही करू तेच खरे, अशा वृत्तीचे द्योतक आहे, सुजाण महाराष्ट्र व मराठी साहित्य रसिक सरकारचा हा अगोचरणा सहन करणार नाहीत असे मत पवार यांनी व्यक्त केले. सरकारने याबाबतीत त्वरीत दिलगिरी व्यक्त करावी, नव्याने पुन्हा संंमेलनाध्यक्षांच्या छायाचित्रासहित जाहिरात द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.
सरकारी जाहिरातीतून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा फोटो गायब
By राजू इनामदार | Updated: February 21, 2025 15:24 IST