पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. आपण त्याला ‘इंडिया ७५’ असा उल्लेख करताे आणि वरवरची विकासाची दृश्ये पाहताे. पण आपण भारत ७५ असे म्हणत नाही. काेराेनानंतरच्या काळात भारतापुढे अनेक आव्हाने आहेत. त्यापैकी गरिबी हे एक आहे. म्हणून भारताला सर्वसमावेशक, वेगवान प्रगती करण्याची गरज आहे, असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या यंदाचा पुणे नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्कार हैदराबादच्या एल. व्ही. प्रसाद, आय इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गुल्लापल्ली एन. राव यांना प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. माशेलकर बाेलत हाेते.
डाॅ. माशेलकर म्हणाले की, भारताला प्रगती करायची असेल तर त्यासाठी इनाेव्हेशन वाढायला हवे आणि ते वाढत आहे. सन २०१६ ते १७ मध्ये देशात वर्षाला एक युनिकाॅर्नची नाेंद व्हायची. आता, आठवड्याला एका युनिकाॅर्नची नाेंद हाेत आहे, ही बाब समाधानकारक आहे. त्यासाठी आपल्या आकांक्षा माेठ्या हव्यात. देशाला गांधींच्या विचाराची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. गुल्लापल्ली राव म्हणाले की, आजही देशात प्रत्येक वर्षी एक कराेड लाेक एका वेळी हाॅस्पिटलमध्ये भरती झाल्याने दारिद्र्यरेषेखाली जातात. डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी व समाजासाठी वेळ दिल्यास मोठ्या प्रमाणावर बदल घडू शकतो.