पुणे : पोटगीची थकबाकी असलेली 3 लाख रुपयांची रक्कम न भरल्याने कौटुंबिक न्यायालयाने पतीला दणका दिला आहे. पत्नीने तिच्या पालनपोषणासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 (3) अंतर्गत याचिका दाखल केली होती. पतीने पोटगीची थकबाकी भरण्याची तयारी दाखवली नाही आणि थकबाकी न भरण्याचे कोणतेही ठोस कारण सांगितले नसल्याने कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता.आर.पहाडे यांनी पतीला तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
पुरेशी साधने असूनही पोटगीची थकबाकी भरण्यास जाणीवपूर्वक टाळल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. अँड मंगेश पी.कदम यांनी पत्नीच्या वतीने काम पाहिले. पतीचे कर्नाटकातील विजापूर येथे कपड्यांचे दुकान आहे. त्यातून चांगले उत्पन्न त्यांना मिळत आहे. परंतु तरीही पतीने न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यास जाणून बुजून नकार दिला. त्यामुळे त्याला अटक करुन बंडगार्डन पोलिस ठाण्याने कौंटुंबिक न्यायालयात हजर केले. विशेष म्हणजे पतीला यापूर्वी एकदा एक महिन्याची कारावासाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली होती. परंतु त्याने पोटगीची थकबाकी देण्यास नकार दिला होता.
पोटगीची थकबाकी देय असल्यास पूर्ण किंवा काही रक्कम भरेपर्यंत कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. कौटूंबिक न्यायालयानेकोणत्याही व्यक्तीला तीन महिन्यांच्या कारावसाची शिक्षा सुनावण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे- अँड. मंगेश कदम, पत्नीचे वकील