पुणे: पुणे महापालिकेचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे स्थायी समितीला सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची उत्सुकता पुणेकरांना लागली आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार आयुक्तांनी १५ जानेवारीपर्यंत स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प मांडणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक राज आहे. त्यामुळे या ठरावाला बगल देत मार्च महिन्यातच अर्थसंकल्प मांडण्यावर सर्वच आयुक्तांनी भर दिलेला आहे. यंदाही मार्च महिन्यातच अर्थसंकल्प मांडणार आहेत. येत्या ४ मार्च रोजी अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता मांडण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केला आहे. महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकांवर भर असणार आहे. याकडे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्पावर राजकीय प्रभाव असणार का?
पालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी विधानभवनात आयुक्त डॉ. राजेद्र भोसले यांनी बैठक घेतली होती. त्यामुळे विरोधकांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यातच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भाजपच्या माजी नगरसेवकांना त्यांना आवश्यक निधी मिळेल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर राजकीय प्रभाव असणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.