पुणे : देशातील लोकशाहीची दिशा बदलत चालली आहे. अशा वेळी लोकशाही मार्गाने हुकूमशाही येऊ शकत नाही, अशा भ्रमात कोणी राहू नये, हिटलरही लोकशाही माध्यमातूनच जर्मनीचा अध्यक्ष झाला होता, असे मत माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
मनोविकास प्रकाशनच्या सुरेश भटेवरा लिखित ‘शोध नेहरू गांधी पर्वाचा’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठा चेबर ऑफ कामर्स टिळक रोडच्या सभागृहात चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी झाले. त्या वेळी ते बाेलत हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर, माजी आमदार उल्हास पवार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता देसाई उपस्थित होते. महाराष्ट्र हरिजन सेवक संघाच्या वतीने माजी आमदार मोहन जोशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चव्हाण व केतकर यांनी भारतीय जनता प्रणित केंद्र सरकारला टीकेचे लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर हल्ला चढवला.
चव्हाण म्हणाले, ‘सध्याच्या सरकारने लोकशाहीच्या प्रथा, संकेत, नियम बदलण्याचा सपाटा लावला आहे. लोकशाहीतील संस्थांची मोडतोड चालवली आहे. एकूणच देशातील लोकशाही धोक्यात आल्याची चिन्हे दिसत आहेत.’
''भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका याच देशात सातत्याने अशांतता का फैलावत आहे, याची कारणे शाेधल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय कारस्थान दिसून येईल. तसेच त्यांना देशातून मदत मिळते. भाजपचा अँन्टी काँग्रेस हा विचार वास्तवात अँटी नेहरू असा आहे. - कुमार केतकर, खासदार''