पुणे: सार्वजनिक आराेग्य विभागाच्या रुग्णालयांच्या साखळीतील सर्वांत माेठे रुग्णालय असलेल्या औंध येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण काही संपायला तयार नाही. रुग्णाच्या मृत्यूनंतर येथे शवविच्छेदन करण्यासाठी व मृतदेह ठेवण्यासाठी असणा-या शवागाराची (डेडहाउस) दुरावस्था झाली आहे. येथे मृतदेह ठेवण्यासाठी सहा शीतपेटया असून त्यापैकी केवळ दाेनच शीतपेटया कार्यरत आहेत. तर उर्वरित चार शीतपेटया दुरूस्तीअभावी बंद असल्याने मृतदेह ठेवण्यासाठी ससून किंवा वायसीएम हाॅस्पिटलचा आधार घ्यावा लागत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात रुग्णालयाच्या मुळात चारच शीतपेटया आहेत. सन २०२२ मध्ये या चारही शीतपेटया बंद हाेत्या. तर दाेन शीतपेटया एका स्वयंसेवी संस्थेने दिल्या आहेत. परंतू, रुग्णालयाच्या चारही शीतपेटया बंद अवस्थेत आहेत. तर, स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या शीतपेटया कार्यरत आहेत. मग, या बंद शीतपेटया कधी सूरू करणार असा प्रश्न उपस्थित हाेत आहेत.
जिल्हा औंध रुग्णालय हे २८० बेडचे हाॅस्पिटल असून येथे माेठया प्रमाणात रुग्ण उपचार घेतात. तसेच दहा बेडचे आयसीयु देखील आहे. परंतू, उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास किंवा बाहेर मृत्यू झाल्यास, अपघात झाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास काही वेळेस ताे मृतदेह शवागारात शीतपेटीमध्ये ठेवण्याची गरज पडते. परंतू, येथे केवळ दाेनच शीतपेटया कार्यरत असल्याने त्यांमध्ये जर मृतदेह आधीच असतील अन तिसरा मृतदेह आलाच तर त्याला जागा मिळत नाही. मग त्यांना आठ किलाेमीटर दुर असलेले वायसीएम रुग्णालय किंवा ११ किलाेमीटर दुर असलेले ससून रुग्णालय गाठावे लागते. यामध्ये मग मृतदेहाची हेळसांड हाेते.
जिल्हा रुग्णालयातील मृतदेह असला किंवा बाहेरुनही नागरिक मृतदेह ठेवण्यासाठी येथे चाैकशी करायला येतात.परंतू, अनेकदा येथे जागाच नसते. त्यामुळे त्यांना दुस-या हाॅस्पिटलला घेउन जावे लागते. तसेच तेथे दिवसभर देखील शवविच्छेदन करणारे डाॅक्टर नसतात. जर बाॅडी आली तर ते फाेन केल्यावर येतात. तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील नाही. त्यामुळे मृतदेहाचे काही झाले तर जबाबदारी काेणाची हा प्रश्न देखील आहे. - शरत शेटटी, इंटरनॅशनल हयूमन राईटस असाेसिएशन