पुणे: राज्यातील दोन महत्त्वाच्या मेट्रो शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’ला यंदाच्या १ जून रोजी ९३ वर्षे पूर्ण झाली. मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. पुणे-मुंबई-पुणे या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे रुळावर धावणारी ही पहिली डिलक्स रेल्वे होती. एकेकाळी याच रेल्वेच्या सुटण्याच्या टायमिंगवर घड्याळाचा वेळ सेट केला जात होता. मात्र, तीच ‘डेक्कन क्वीन’ आता दररोज उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह रेल्वेप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे.
डेक्कन क्वीनला दख्खनची राणी असेदेखील मराठीत संबोधले जाते. या राणीचा दिमाख आणि रुबाब काही असा होता की, पुणे स्टेशनवरून सकाळी सव्वासातला निघालेली ही रेल्वे दहा वाजून वीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (तेव्हाचे व्हीटी)ला पोहोचत असे. ही रेल्वे धावायला लागली की, अन्य गाड्या बाजूला उभ्या केल्या जात होत्या. मात्र, आता या दख्खनच्या राणीकडे रेल्वे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र रेल्वेला दररोज होणाऱ्या उशिरावरून स्पष्ट होत आहे.
गेल्या १० ते १२ दिवसांत ही रेल्वे ११ ते ५२ मिनिटे उशिराने पोहोचल्याने नियमित प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पुण्याहून जरी अनेकदा डेक्कन क्वीन वेळेत सुटली तरी मुंबईमध्ये ठाण्याजवळ या रेल्वेला लोकल पुढे जाऊ देण्यासाठी लाल सिग्नल दाखवला जात आहे. आधी या दख्खनच्या राणीसाठी एक रेल्वे ट्रॅक मोकळा सोडला जायचा, आता मात्र तसे होत नाही. याचा परिणाम, सरकारी-खासगी कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी, न्यायालयीन कामकाजासाठी ये-जा करणारी मंडळी यांना उशिराने पोहोचावे लागत आहे.
लोकल जात नाही, तोपर्यंत या राणीला थांबवून ठेवले जाते
रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका या दख्खनच्या राणीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. ही जगातील पहिली डिलक्स रेल्वे म्हणून ओळखली जाणारी रेल्वे आहे. लोकल जात नाही, तोपर्यंत या राणीला थांबवून ठेवले जात आहे. मुंबई विभागाने डेक्कन क्वीनला वेळेत जाण्यासाठी तत्काळ मार्ग उपलब्ध करून द्यावा. - हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान झालेला उशीर..
१) १ ऑगस्ट - १२ मिनिटे२) २ ऑगस्ट - १४ मिनिटे३) ३ ऑगस्ट - १४ मिनिटे४) ४ ऑगस्ट - ४४ मिनिटे५) ५ ऑगस्ट - ५२ मिनिटे६) ६ ऑगस्ट - १३ मिनिटे७) ७ ऑगस्ट - १४ मिनिटे८) ८ ऑगस्ट - ११ मिनिटे९) ९ ऑगस्ट - १४ मिनिटे१०) १० ऑगस्ट - १३ मिनिटे