पुणे : खाद्य पदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयला लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील काही भागांमधील गुंड त्यांना लुटत असून, त्यामुळे डिलिव्हरी बॉयच्या मनात दहशत निर्माण होत आहे. रामटेकडी येथील उर्दू शाळेमागे एका डिलिव्हरी बॉयला याचा अनुभव आला.
याप्रकरणी निलेश पंडित गायकवाड (३१, रा. मांजरी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी करण, विशल्या, मुज्जा, आणिशुभ्या अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रामटेकडी येथील डॉ़ डब्ल्यु आर खान उर्दु शाळेच्या मागील गल्लीत २६ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश हे झोमॅटो कंपनीचे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. ग्राहकाची ऑर्डर देण्यासाठी ते दुचाकीवर गेले होते. डिलिव्हरी जेथे द्यायची, त्या ठिकाणी बोळीत अंधारातून ते जात होते. त्यावेळी अचानक चौघा जणांनी त्यांना अडवले. कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत दमदाटी करु लागले. निलेश यांची सॅक तपासून त्यातील हार्ड डिस्क, चेक बुक आणि २ हजार रुपये रोख असा ५ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून चौघांनी पळ काढला. याप्रकरणाचा पढील तपास सहायक पोलिस निरीक्षक देशमुख करत आहेत.