बारामती : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, ज्येष्ठ विचारवंत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीसुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या सुरेल सुरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले आहेत.
''गेल्या आठ दशकाहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वर्गीय सुरांनी आज विराम घेतला. भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने आज संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.' अशा शब्दात पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.''