पिंपरी : सहा महिन्यांपूर्वी पायलने सैनिक अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. अकॅडमीच्या संचालकांनी त्यांची सहल नेली. मात्र, त्या सहलीमध्ये संचालकांनी त्यांच्या कुटुंबीयांना नेले. त्यामुळे मुलांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही मोठी घटना घडली. त्यामध्ये आमच्या पायलचा जीव गेला, अशी माहिती देवगड दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पायल बनसोडे हिचा भाऊ अभिजीत बनसोडे यांनी व्यक्त केली.
निगडी येथील सैनिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची कोकणात सहल गेली होती. देवगड येथील समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटना होऊन पाच मुलांचा मृत्यू झाला. त्यामध्ये त्रिवेणीनगर येथील पायल बनसोडे हिचाही समावेश आहे. तिच्यावर रविवारी रात्री उशिरा निगडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तर बाकी चार मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. पायल हिने सहा महिन्यांपूर्वी सैनिक अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. तिची देशसेवा करण्याची इच्छा होती. त्यासाठी कुटुंबीयांनी पोटाला चिमटा काढून तिला अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन दिला होता. अकॅडमीच्या संचालकांनी सहलीचे आयोजन केल्याने पायल त्यामध्ये सहभागी झाली. मात्र, शनिवारी सायंकाळी अचानक तिच्या शिक्षकांनी ती बेशुद्ध झाल्याची माहिती फोनवर दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी देवगड येथे धाव घेतली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह बघावा लागला. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षण घेणारी पायल अशी निपचित पडल्याने कुटुंबीयांच्या भावनेचा बांध फुटला. नियतीने हसत्याखेळत्या कुटुंबातील पायलला हिरावल्याने नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.
या घटनेला संस्थाचालक माने हे जबाबदार आहेत. त्यांनी अकॅडमीच्या मुलांची सहल असताना त्यांच्या कुटुंबीयांना सोबत घेतले. त्यांची पत्नी, दोन मुले सोबत असल्याने त्यांनी मुलांकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. - अभिजीत बनसोडे, भाऊ.