पुणे : ‘‘बारसू येथे होणारा विनाशकारी प्रकल्प हा केवळ स्थानिक लोकांचा नाही, तर तो राज्याचा, देशाचा आहे. कारण बारसू येथील जैवविविधतेवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यासाठी आम्ही आज पुण्यात राज्यातील कार्यकर्त्यांना, विविध पुरोगामी संघटनांना, डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलावून बैठक घेतली. त्यात राज्यव्यापी लढा देण्यासाठी दोन समिती गठित केल्या आहेत, त्यानूसार आम्ही लढा देणार आहोत,’’ अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
बारसू रिफायनरी विरोधात स्थानिक पातळीवर लढा सुरू आहे. त्या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी मंगळवारी (दि.३०) पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात बैठक झाली. या वेळी सुभाष वारे, सत्यजीत चव्हाण, किशोर जाधव, लता भिसे, नितीन पवार, संपत देसाई, अंकुश कदम, सायली पलांडे-दातार, स्थानिक काशिनाथ बोरले, प्रतीक्षा कांबळे आदी उपस्थित होते.
पाटणकर म्हणाले, परदेशामध्ये असे विनाशकारी प्रकल्प केले जात नाहीत. आपल्याला इंधन, ऊर्जा हवी आहे. पण त्याबदल्यात निसर्गाचे नुकसान नको. बारसू येथे जैवविविधता संपन्न असा प्रदेश आहे. तिथे कास पठारपेक्षा सुंदर कातळशिल्प, सडे आहेत. त्यांचे महत्त्व खूप असून, ते या प्रकल्पामुळे नष्ट होतील. हा लढा राज्यव्यापी करण्यासाठी एक राज्यस्तरीय बारसू रिफायनरी विरोधी लढा समिती आणि अभ्यास-संशोधन समिती आज गठित केल्या. त्यांची नावे ठरवली. येत्या १७ जून रोजी मुंबईत दोन्ही समितींच्या बैठका होतील. त्यातून पुढील लढा ठरविण्यात येईल.’’
निसर्गाची हानी करू नये
प्रकल्पाला विरोध करताना तुम्हाला इंधन, ऊर्जा नको आहे का ? असे विचारले जाते. आम्हाला ते हवे आहे. पण त्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय आहेत ना ! विनाशकारी प्रकल्पाऐवजी पर्यावरणपूरक, रिन्यूएबल एनर्जी करण्यासाठी आम्ही काही पर्याय सरकारला देत आहोत. ते राबवा आणि इंधन, ऊर्जा तयार करावी. निसर्गाची हानी करू नये. - डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते