पुणे : थोरल्या भावाला पाच मुली. त्याला एकही मुलगा नव्हता. धाकट्या भावाला दोन मुले असल्याने त्याने आपला एक मुलगा भावाला दत्तक दयायचे ठरविले. मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच दोन्ही भावांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये जमीन वाटपाबाबत वाद सुरू झाले. 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर लोकन्यायालयात मिटला.
पूर्व हवेली तालुक्यातील कदम वाक वस्ती गावातील नावाजलेल्या शिवाजी पाटील (नाव बदललेले आहे) कुटुंबातील दोन सख्खे भाऊ. यामध्ये, थोरल्या भावाला पाच मुली व धाकट्या भावाला दोन मुले असल्याने थोरल्या भावाने एक मुलगा धाकट्या भावाला दत्तक देण्याचे ठरवले. कालांतराने पाच मुलींसह दोन मुलांचीही लग्न झाली. मात्र, दोन भावांमधील मुल दत्तक घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया राहून गेली. यादरम्यान, दोन्ही भावांचा मृत्यू झाल्यानंतर, 1954 सालापासून दोन्ही भावाच्या कुटुंबामध्ये शेतजमिनीवरून वाद-विवाद सुरू झाले.
तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचूनही कुटुंबीय एकमेकांशी बोलत नव्हते.. यादरम्यान, दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला. शेतजमिनीचा वाद लोकन्यायालयात आल्यानंतर अॅड. वैभव धायगुडे-पाटील यांनी त्यामध्ये, कुटुंबियांच्या 23 बैठका घेत समुपदेशन केले. त्यानंतर कुटुंबातील चौथ्या पिढीतील तरुण सदस्यांनी पुढाकार घेऊन ज्येष्ठांची समजूत काढली. मागील 70 वर्षांपासून सुरू असलेला वाद लोकन्यायालयात निकाली निघाल्याने कुटुंबियांसह न्यायाधीश पुराड उपाध्ये यांनीही समाधान व्यक्त केले. याप्रकरणात, अॅड. संदीप कुडते, अॅड. शरद आखाडे, अॅड. प्रतीक्षा कांबळे आणि अॅड. बलराज सपाटे यांनी कामकाज पाहिले.