ऋषीकेश काशीद
मेखळी : मागील वर्षी जिल्ह्यात सर्वांत कमी वजनाचे बाळ म्हणून नोंद झालेली गुरुप्रिया तब्बल एका वर्षांनंतर तिला जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना भेटली. तिला पाहताच अनेकांना मागील वर्षीचा प्रसंग तर आठवलाच, पण काहींनी डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
माळेगाव बुद्रूक येथील कल्याणी अमित भापकर यांनी मागील वर्षी अवघ्या ५८० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला. भापकर या गर्भावस्थेत नियमित तपासण्या करून घेत होत्या. सहाव्या महिन्यांत बाळाला होणारा रक्तपुरवठा अचानक बंद होऊन बाळाकडून आईला रक्तपुरवठा सुरू झाल्यामुळे कल्याणी भापकर यांना त्रास सुरू झाल्यानंतर बारामती येथील देवकाते बालरुग्णालय येथील डॉ. वरद देवकाते यांनी अत्यावश्यक प्रसूती करण्याचा सल्ला भापकर यांना दिला होता. भापकर दाम्पत्याने सहमती दर्शविल्यानंतर बारामती येथील चैतन्य हॉस्पिटल येथे बालरोगतज्ज्ञ डॉ. वरद देवकाते, गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. आशिष जळक व डॉ सुहासिनी सोनवले यांनी सिझेरियन करून प्रसूती यशस्वी केली. हे बाळ जेमतेम तळहाताच्या आकाराचं होतं. साधारण वजनापेक्षा कमी वजन असल्यास ते दुर्मिळ समजण्यात येते. सहा महिन्यांत जन्माला आलेल्या या बाळाला तत्काळ इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागलं. हे इवलंसं बाळ जगेल का याची शाश्वती डॉक्टरांनाही नव्हती.
या बाळाचं नाव गुरुप्रिया असून, सध्या ती एक वर्षांची आहे व तिचे वजन ५ किलो असून, ती अगदी निरोगी आहे. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करूनही ती जिवंत राहिली याचं डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतं. ती जगली हा एक चमत्कार असल्याचं डॉ. वरद देवकाते यांनी सांगितले. तर गुरुप्रियाच्या जन्मापासून घरात खूप आनंदाचं वातावरण असल्याचं वडील अमित भापकर यांनी सांगितले तसेच डॉ. वरद देवकाते, डॉ. आशिष जळक, डॉ. सोनवले व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.