पुणे: घराचा दरवाजा आतून बंद होता, बाथरुमचा दरवाजाही आतून बंद, बाथरुममध्ये महिला मृतावस्थेत सापडली. शवविच्छेदनात तिचा गळा आवळल्याने तिचा मृत्यु झाल्याचा निष्पन्न काढण्यात आला. आतून बंद असलेल्या बाथरुममध्ये दुसरा जाऊन तिचा खून कसा करेल, हे रहस्य पोलिसांसमोर उभे राहिले. चौकशीत हा प्रकार कसा घडला, हे समोर आले आणि खूनाचा प्रकार उघडकीस आला.
मुलीबरोबरच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याने तरुणाने कुत्र्याला बांधण्याकरीता असलेल्या बेल्टने गळा आवळून आईचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवांशु दचाराम गुप्ता (वय २३, रा. प्रतिकनगर, मोहनवाडी, येरवडा) याला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. वर्षा क्षीरसागर (वय ५८, रा. माऊंटव्हर्ट अॅल्टसी, सूस रोड, पाषाण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार १८ जानेवारी रोजी मध्यरात्री बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत क्षीरसागर यांच्या मुलीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये मागील ७ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. परंतु दोघांमध्ये वाद होत असल्याने फिर्यादी यांनी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. तसेच फिर्यादीची आई वर्षा हिनेही प्रेमसंबंध ठेवायचे नाही. असे सांगितल्याने शिवांशु हा चिडला होता. फिर्यादी या १७ जानेवारी रोजी चिंचवडला गेल्या होत्या. त्यावेळी रात्री वर्षा या एकट्याच घरी होत्या. तेव्हा शिवांशु घरी आला. त्याने त्यांच्याशी वाद घातला. कुत्र्याला बांधण्याकरीता असलेल्या बेल्टने वर्षाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह बाथरुममध्ये टाकून तो निघून गेला.
दुसऱ्या दिवशी फिर्यादी या घरी आल्या. तेव्हा त्यांना घर आतून बंद असल्याचे आढळून आले. आवाज देऊनही फिर्यादीची आई दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांची आई ही बाथरुममध्ये असल्याचे व दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. बाथरुमचा दरवाजाही तोडल्यावर वर्षा या मृतावस्थेत आढळल्या. शवविच्छेदनात गळा आवळल्यामुळे मृत्यु झाल्याचे निदान करण्यात आले. घर, बाथरुम आतून बंद असताना दुसरा कोणी येऊन त्यांचा गळा आवळून कसा खून करेल, याचे कोडे पोलिसांना पडले होते. पोलिसांना शिवांशु गुप्ता हा रात्री घरी येऊन गेल्याचे समजले. त्याच्याकडे तपास केल्यावर त्याने खून केल्याची कबुली दिली व घर कसे आतून बंद केले हे दाखवले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस निरीक्षक जानकर हे तपास करीत आहेत.