पिंपरी : मुलाची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला दवाखान्यात घेऊन जात असताना घराचा दरवाजा अनावधानाने उघडा राहिला. याचा गैरफायदा घेत शेजारी राहणाऱ्या महिलेने घरात घुसून ६ लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. काळेवाडी पोलिसांनी महिलेला गजाआड केले.
सोनाली नीलेश ओहोळ (३४, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. आकाश संतोष आचारी (३०, नखातेवस्ती, रहाटणी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी याबाबत माहिती दिली.
फिर्यादी आकाश हे पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलासमवेत राहतात. सोनाली ही त्यांच्या शेजारी राहते. सोमवारी (दि. १६) आकाश यांच्या दीडवर्षीय मुलाची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे आकाश आणि त्यांची पत्नी घाईघाईत मुलाला दवाखान्यात घेऊन गेले. यावेळी घराचा दरवाजा अनावधानाने उघडा राहिला. याचा गैरफायदा घेत सोनाली ही त्यांच्या घरात घुसली. कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, कडे, बदाम, सोनसाखळी, चांदीच्या बांगड्या, जोडवे असा सहा लाख २९ हजार रुपये किमतीचा ८.७ तोळे वजनाचा ऐवज चोरून नेला. आकाश हे मुलावर उपचार करून घरी आले असता, त्यांना घरामधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. आकाश यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी संशयावरून शेजारी राहणाऱ्या सोनाली हिची चौकशी केली असता, तिने चोरी केल्याची कबुली दिली. तिच्या घरातून चोरीला गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट, निरीक्षक विक्रम बनसोडे, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, नागनाथ सूर्यवंशी, पोलिस अंमलदार प्रमोद कदम, स्वप्नील खेतले, अतिश जाधव, रमेश खेडकर, अजय फल्ले, प्राजक्ता चौगुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.