पुणे : शहरात पावसाळीपूर्व कामे करताना नालेसफाई व अन्य कामांसाठी ११ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. पण कामे का झाली नाही. पुणे शहर का तुंबले, असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख यांना धारेवर धरले. तसेच या कामांची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली.
दरम्यान येत्या आठ दिवसात ही कामे झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार सुळे यांनी आयुक्तांना दिला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, ऍड निलेश निकम आदी उपस्थित होते.
"...तर रस्त्यावर उतरू"-
खासदार सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना घाईत केलेल्या विकास कामामुळे हे प्रश्न निर्माण झाले असल्याचा आरोप केला. आम्ही आयुक्तांना आठ दिवसांचा वेळ दिला आहे. तसेच या कामामध्ये आमची काही मदत लागली तरी सांगा असेही सांगितले आहे. येत्या २१ तारखेला पुन्हा या प्रश्नी आयुक्तांची भेट घेणार असून, शहरातील नालेसफाई व पाणी तुंबण्याचे प्रकार थांबले नाहीत तर रस्त्यावर उतरू असेही त्यांनी सांगितले.
महापालिका कारवाई का करत नाही?
आज आम्ही पाणी साचलेल्या भागात पाहणी केली. यात नाल्यावरून रस्ते केलेले आढळून आले. यात पाण्याचे आउटलेट बंद असल्याचे दिसून आले. ५० ठिकाणी नाले ब्लॉक केले गेले आहेत. रस्त्यांची लेव्हल चुकली आहे. नालेसफाई करण्यात जो ठेकेदार कामचुकारपणा करतो त्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई का केली नाही. पुणे-सातारा रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्लॅक लिस्ट केले तसे महापालिका का कोणावर कारवाई करीत नाही, याचा जाब सुळे यांनी विचारला.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार-
पुणे शहरात गुन्हेगारी, ड्रग्स इशू वाढतायेत. शहरातील क्राईम रोज वाढत आहे. एका पावसात पुणेकरांची वाईट अवस्था झालीये. सगळ्या वाईट गोष्टी पुण्यातच का घडतात. याविषयी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप सुळे यांनी केला. पुण्यातून कंपन्या बाहेर चालल्या आहेत. उदय सामंत हे नाकारत असले तरी याचा देत माझ्याकडे उपलब्ध आहे. मी जे बोलते ते प्रामाणिकपणे बोलते असेही त्यांनी सांगितले. नीट परीक्षेमध्ये गोंधळ हा आश्चर्यकारक आहे. हा विद्यार्थ्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मी त्याचा निषेध करते. असेही सुळे यांनी सांगितले.
सुळे म्हणाल्या-
- मी पुण्याच्या विकास कामासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. लोकशाही आहे, इतना तो हक बनता है.
- बारामतीचा दादा बदला व युगेंद्र पवार यांच्या विषयी कोण काय म्हणाले मला माहिती नाही.
- मनोज जरांगे यांच्याबाबत सरकार असंवेदनशील आहे.
- सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय