बारामती: बारामतीच्यावैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या कारचा ९ डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघे गंभीर जखमी होते. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय चेष्टा बिश्नोई (वय २१) या शिकाऊ वैमानिक असलेल्या युवतीचा बुधवारी (दि १८)पुणे शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यु झाला. मंगळवारी सकाळी १० वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या तीनवर पोहचली आहे. बारामती एमआयडीसीतील रेड बर्ड फ्लाइंग अॅकेडमीचे चार विद्यार्थ्यी ९ डिसेंबर रोजी पहाटे कार मधून बारामतीकडून भिगवणच्या दिशेने निघाले होते. यावेळी कृष्णा मंगल सिंग (रा.बिहार) हा गाडी चालवत होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लांमजेवाडीजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये त्यात दक्षू शर्मा (वय २१,रा.दिल्ली) आणि आदित्य कणसे (वय २९,रा.मुंबइ) यांचा जागीच मृत्यु झाला. तर कृष्णा मंगलसिंग (वय २१) आणि चेष्टा बिश्नोई (वय २१,रा.राजस`थान) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. सुरवातीला या दोघांवर भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यामध्ये चेष्टा हिची प्रकृती गंभीर होती, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यानंतर तिला पुणे शहरातील खासगी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले होते. तिच्यावर गेल्या ९ दिवसांपासुन उपचार सुरु होते. आज तिचा मृत्यु झाला. त्यामुळे वैमानिक बनण्याचे तिचे स्वप्न अखेर अपुर्णच राहिले आहे.
वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले; ९ दिवसांनी ‘त्या’ युवतीची मृत्युची झुंज अखेर संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 17:07 IST