मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.काल मंत्री छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात गौप्यस्फोट केले. शरद पवार भाजपासोबत जाणार नव्हते, परंतु मी राजीनामा देऊन सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष बनवतो त्यानंतर तुम्हाला हव ते करा, असं शरद पवार यांनी सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आज पत्रकार परिषद घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे सर्वजण सारख भाजपसोबत जायच म्हणत होते तेव्हा पवार साहेब दुखावले होते, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्याातून अनेकांनी पवार यांना विनंती केली. तर दुसरीकडे व्यासपीठावर छगन भुजबळ म्हणाले होते, की कमिटी काही नको, आम्हाला शरद पवारच अध्यक्ष हवेत. एका बाजूला हे म्हणतात पवार साहेब तानाशाही करतात दुसरीकडे अध्यक्ष हेच हवेत म्हणतात हा विरोधाभास दिसतो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"काल भुजबळ एका मुलाखतीत चारवेळा म्हणाले, पवार साहेब आम्हाला म्हणाले होते मी तुमच्यासोबत भाजपसोबत येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता. सातत्याने पवार साहेब असं म्हटले आहेत. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलैचा शपथविधी शरद पवारांना माहिती नव्हता, त्यांना अंधारात ठेऊन हा निर्णय घेतला. हे कालच्या मुलाखतीत स्पष्ट झालं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.