पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणा-या रिंगरोडच्या दुस-या टप्प्यातील पूर्व रिंगरोडच्या जमिन मोजणी प्रक्रीयेला गती मिळाली असून, पुढील आठ दिवसांत संपूर्ण मोजणी प्रक्रिया पूर्ण होईल. याचबरोबर पहिल्या टप्प्यातील 37 गावांपैकी 32 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. यापैकी काही गावांमध्ये लवकरच खरेदीखत सुरू करण्यात येणार आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्प्यात हा रिंगरोड करण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम भागातील रिंगरोडसाठीची जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात 37 गावांपैकी 36 गावांची मोजणी पूर्ण झाली असून, या पैकी 32 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. तर 7 गावांचे दर अंतिम झाले आहेत. या गावांमध्ये लवकरच खरेदीखत सुरू करण्यात येणार आहे. तर दुस-या टप्प्यातील पूर्व रिंगरोडची मोजणी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. येथे 46 पैकी 19 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. आठ दिवसांत 9 गावांची मोजणी पूर्ण झाली असून, शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच पुढील आठ दिवसांत म्हणजेच 22 एप्रिल पूर्वी सर्व गावांची मोजण पूर्ण करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
''जिल्ह्याच्या विकासाठी महत्वपूर्ण ठरणा-या रिंगरोडची पहिल्या टप्प्यातील मोजणी पूर्ण झाली असून, दुसर्या टप्प्यातील मोजणी येत्या आठ दिवसांत 22 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी मिळालेले दर लक्षात घेऊन रिंगरोडसाठी देखील जास्तीत जास्त दर मिळावे यासाठी प्रशासनाचा आहे यामुळेच सध्या रिंगरोडच्या मोजणीला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लवकरच प्रत्यक्ष खरेदीखत सुरू करू असे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले.''