बारामती : जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजीस पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात बारामतीत सकल जैन समाज एकवटला. तसेच गुजरात मधील पवित्र तीर्थक्षेत्र श्री शत्रूंजय तीर्थ, पालीथाना व इतर जैन तीर्थक्षेत्र येथे होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी(दि २१) मूक मोर्चा काढत निषेध नोंदविला. या मोर्चात महिलांचा आजचा सहभाग लक्षणीय होता. शहरात आज सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.
आज महावीर भवन येथुन मोर्चा निघाला. भिगवण चौक, गांधी चौक, गुणवडी चौक मार्गे मोर्चा प्रशासन भवन येथे पोहचला. झारखंड सरकार आणि केंद्र सरकारने जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेद शिखरजी स्थळ हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्याबद्दल आणि तसेच गुजरात मधील पवित्र तीर्थक्षेत्र श्री शत्रूंजय तीर्थ, पालीथाना व इतर जैन तीर्थक्षेत्र येथे होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात आज मूक मोर्चा निघाला होता.
यावेळी सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले. यामध्ये समाजाची भूमिका मांडण्यात आली. जैन बांधवांच्या सर्व भावना राज्य व केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे वीरधवल गाडे ,मनसेचे अॅड.नीलेश वाबळे आणि शिवसेना ठाकरे गटासह शेर सुहास मित्र मंडळाच्या वतीने शुभम अहिवळे, प्रा.रमेश मोरे, गौतम शिंदे यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. सकल जैन समाजातील महिला व पुरुषांनी आज मोठ्या प्रमाणात या मोर्चास हजेरी लावत निषेध नोंदविला.