पुणे : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मिचांग चक्रीवादळाचा तडाखा आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, छत्तीसगड, विदर्भ या भागांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात येत्या तीन तासांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात ढगाळ वातावरण असून, किमान तापमानात पुढील दोन दिवस घट होण्याची शक्यता आहे.
मिचांग चक्रीवादळ हे आंध्र प्रदेशावरून उत्तर दिशेकडे सरकत आहे. काही तासांमध्ये आंध्र प्रदेशमध्ये त्यामुळे पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर पुढे विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव जाणवून पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळतील. ७ डिसेंबरनंतर राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
पुणे व परिसरात पुढील ७२ तासांमध्ये सकाळी हलके धुके पडणार आहे. तसेच आकाश दुपारी ढगाळ राहणार आहे. ७ डिसेंबरनंतर हवामान कोरडे राहील. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.