कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला; पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 05:35 PM2024-09-26T17:35:20+5:302024-09-26T17:35:49+5:30
पंतप्रधानांच्या हस्ते होणारा मेट्रो उदघाटनाचा कार्यक्रम पाऊस असल्यामुळे रद्द नाही तर पुढे ढकलला आहे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर येणाऱ्या मोदींनी आपला दौरा रद्द केला आहे. याबाबत अजित पवारांनी माहिती दिली आहे. दौऱ्याची आम्ही पूर्ण काळजी घेतली होती पण पाऊस असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अजित पवार म्हणाले, आम्हाला पंतप्रधानांच्या ऑफिसमधून फोन आला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. आपल्याकडे दुपारी तीन वाजल्यापासून पुन्हा पाऊस येणार असल्याचा अंदाज दिला होता. पुणेकरांची गैरसोय होईल आणि नागरिकांना त्रास होईल त्यामुळे आम्ही पुण्यातील शाळेला सुद्धा सुट्टी दिली होती. आम्ही पूर्ण काळजी घेतली होती पण पाऊस असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.
मेट्रो सेवाही रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकातून मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. त्यानंतर हि मेट्रो प्रवाशांसाठी सुरु होणार होती. पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना उदघाटन समारंभाला येणे शक्य होणार नाही. उदघाटन समारंभ रद्द झाल्याने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक ही सेवा कार्यान्वित नसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे. मेट्रो प्रवासी सेवेत आज जे इतर बदल करण्यात आले होते. ते रद्द करण्यात आले असून मेट्रो सेवा नियमितपणे सुरु राहील असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कसा होता पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा?
पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकात येणार होते. तिथून ते मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. स्वारगेटवरून गाडीने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार होती. मेट्रोसह एकूण १२ प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचाही समावेश होता. सभेनंतर फर्ग्यूसन महाविद्यालय परिसरात त्यांच्या रोड शोचेही आयोजन करण्यात आले होते.