पुणे: तुझ्यामुळे वाटोळे झाले असे म्हणून सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. विजयकुमार बबरुवाना शिंदे (वय ४२), बबरुवान शिंदे (वय ७०) आणि आयोध्या शिंदे (वय ६०, सर्व रा. कुबेरा संकुल हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनिता विजयकुमार शिंदे (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. हा प्रकार २०१३ पासून ११ मार्च २०२३ दरम्यान घडला.
याप्रकरणी देविदास बाबुराव मणचुके ( वय ७३, रा. बीड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता हिचा विवाह विजयकुमार शिंदे याच्याबरोबर २००७ मध्ये झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. लग्नानंतर पती व सासू सासऱ्यांनी वेळोवेळी शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक छळ सुरु केला. तिला तुझ्यामुळेच माझे वाटोळे झाले आहे. तू मरुन गेलीस तर माझ्या पाठीमागची पिडा निघून जाईल एकदाची असे बोलून तिचा छळ केला गेला. या छळाला कंटाळून अनिता हिने ११ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.