महाविकास आघाडी व युतीबाबतच्या इंदापूरकरांच्या विश्वासाला गेला तडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 03:28 PM2024-11-17T15:28:05+5:302024-11-17T15:30:40+5:30

आघाडी व युती याबाबतच्या इंदापूरकरांच्या विश्वासाला यंदा तडा गेल्याने आघाडी अथवा युतीपेक्षा यंदा व्यक्तिकेंद्रित मतदान होईल असे दिसते आहे.

The faith of the people of Indapur about the Mahavikas Aghadi and the alliance has been shattered | महाविकास आघाडी व युतीबाबतच्या इंदापूरकरांच्या विश्वासाला गेला तडा

महाविकास आघाडी व युतीबाबतच्या इंदापूरकरांच्या विश्वासाला गेला तडा

इंदापूर : लोकसभा निवडणुकीत एकत्र येऊन महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणारे तिघे जण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहिलेले आहेत. आघाडी व युती याबाबतच्या इंदापूरकरांच्या विश्वासाला यंदा तडा गेल्याने आघाडी अथवा युतीपेक्षा यंदा व्यक्तिकेंद्रित मतदान होईल असे दिसते आहे. विधानसभा निवडणुकीतील दोन उमेदवार एकाच पक्षाचे घटक आहेत. त्यामुळे एकाच पक्षाची मते किती विभागणार असा प्रश्न पडलेला इंदापूर तालुक्यातील मतदार स्पष्टपणे प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या मन:स्थितीत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार, आ. दत्तात्रय भरणे यांनी भाजपशी संधान बांधले. त्यांच्या जाचामुळे भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा जाच अधिकच वाढला. लोकसभा निवडणुकीदरम्यान आधी खा. सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणारे प्रवीण माने लोकसभा निवडणुकीपुरते अजित पवारांकडे आले. आ. भरणे, हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने यांनी एकत्रितपणे सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला.

तिघेही विरोधात असूनदेखील मतदारांनी खा. सुप्रिया सुळे यांना भरघोस मतदान केले. आता हे तिघे ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांमधील हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेच घटक आहेत.

माने यांनी या पक्षाशी फारकत घेतलेली नाही. माने यांचे वडील दशरथ माने यांनी निवडणूक जिंकल्यानंतर प्रवीण माने शरद पवारांकडेच जातील असे सांगताना अजित पवार यांच्याशी संपर्क साधल्याचे जाहीर सभेत स्पष्ट केल्याने मतदारांच्या डोक्यात गुंता झाल्याचे चित्र आहे. आ. दत्तात्रय भरणे यांना अतिप्रमाणात झालेल्या ''मलिदा गँग''च्या प्रचाराने नाकीनऊ आणलेले आहे.

खरे तर दिलखुलास व माणसांमध्ये रमणाऱ्या दत्तात्रय भरणे यांनी होत असणाऱ्या विकासकामांवर अजित पवारांसारखी नजर ठेवणे आवश्यक होते. निकृष्ट कामांची दखल घेऊन, ती व्यवस्थित करणे गरजेचे होते. त्यांनी ते केले असते तर त्यांच्यावर मलिदा गँगचा ठपका पडला नसता, असे सामान्य मतदारांनी बोलताना सांगितले.

हर्षवर्धन पाटील यांनी पाणलोट क्षेत्रातील पुलाचा मुद्दा व लोकसभा निवडणुकीतील अदृश्य सहभागाचा मुद्दा उचलण्याची काहीही आवश्यकता नव्हती. त्यामुळे त्यांच्याविषयी शहरातील व्यापारी वर्गात व पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये नाराजीची भावना दिसते आहे. त्यांनी भाजप सोडल्यानंतर भाजपचे कागदावर दिसत असलेले ३९ हजार मतदान प्रवीण माने यांच्याकडे झुकल्याचे दिसत आहे, असा अनेक मतदारांचा होरा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रवीण माने यांच्या रूपाने एक समंजस, तरुण व कसलाही डाग नसणारा आश्वासक पर्याय मिळाला असल्याची मतदारांची प्रतिक्रिया आहे. इंदापूर हा धर्मनिरपेक्ष पक्षांना पाठिंबा देणारा तालुका आहे. यंदाच्या वर्षी मात्र वाढलेल्या नवमतदारांमुळे व्यक्तिकेंद्रित मतदानदेखील होऊ शकेल, असे चित्र दिसते आहे.

जय-पराजयाला तीन हजार मते कारणीभूत

१९९५ पासून आजतागायत झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विरुद्ध आ. दत्तात्रय भरणे यांच्यात झालेल्या लढतीत पाटील यांची ज्या ज्या वेळी सरशी झाली, त्यामध्ये त्यांनी मोठे मताधिक्य मिळवले होते, तर त्या तुलनेत आ. भरणे अगदी थोडक्या मताधिक्याने जिंकले होते. जास्तीत जास्त आठ ते दहा हजार मते तर कमीत कमी तीन हजार मते उमेदवाराच्या विजयाला व पराभवाला कारणीभूत ठरणार आहेत. त्यामुळे या तिरंगी लढतीत बाजी मारण्यासाठी कोणता उमेदवार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

_______________________________________

Web Title: The faith of the people of Indapur about the Mahavikas Aghadi and the alliance has been shattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.