पुणे : ‘बाळा’ने कार चालवायला मागितली, तर चालवायला दे, तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालनेच दिली. अग्रवालकडे काम करणाऱ्या ड्रायव्हरची पोलिसांनी चौकशी केली. चालकाने दिलेल्या जबाबातून ही माहिती उघड झाली आहे. तसेच अपघातग्रस्त पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असताना अग्रवालने मुलाच्या ताब्यात कार दिल्याचे उघडकीस आले. कल्याणीनगर अपघात प्रकरणात अग्रवालसह तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.कल्याणीनगरातील अपघातानंतर कारचालक ‘बाळा’विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलाला मद्य उपलब्ध करून देणे तसेच त्याला कार दिल्याप्रकरणी अल्पवयीन बाळाचा बाप विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली. ‘बाळा’ने ज्या पबमध्ये मद्यप्राशन केले होते, तेथील दोघांना अटक केली. त्यानंतर विशाल अग्रवाल (५०), ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (३४, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) आणि जयेश सतीश गावकर (२३, रा. केशवनगर, मुंढवा) यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
मुलगा जातो, तिथे मद्य मिळते हे माहित होतेnअल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल, पबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, त्या हॉटेल आणि पबममध्ये मद्य मिळते, याची माहिती अग्रवाल याला होती. तरीही त्याने मुलाला पार्टीला जाण्यास परवानगी दिली. पार्टीसाठी जाताना त्याला पैसे दिले होते का?, किती पैसे दिले होते किंवा क्रेडिट कार्ड दिले होते काय? पार्टी करण्यासाठी आणखी कोण होते? याबाबत सखोल तपास करायचा आहे.
nत्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभुते आणि योगेश कदम यांनी केला. न्यायालयाकडून अग्रवाल, शेवानी आणि गावकर यांना २४ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अग्रवालकडून दिशाभूलपोलिसांनी अग्रवाल याच्याशी संपर्क साधला असता, तो त्यावेळी पुण्यातच होता. मात्र, त्याने पोलिसांना मी शिर्डीत आलो आहे, अशी खोटी माहिती दिली, असे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी न्यायालयात सांगितले. अग्रवालला मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. अटकेनंतर त्याची झडती घेण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे एक साधा मोबाइल सापडला. या मोबाइलमधील सिमकार्ड १९ मे रोजी वापरात आल्याचे आढळून आले आहे. अग्रवाल याने त्याचा मूळ मोबाइल लपवून ठेवला आहे.
कोर्टाबाहेर अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्नपुणे : आरोपी वडिलाला बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाच्या गेटसमोरच पुणेकरांच्या भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला. कोर्ट परिसरात पोहोचताच विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला.
पोलिसांच्या गाडीच्या काचा बंद असल्याने शाई फक्त वाहनावर उडाली. ‘वंदे मातरम्’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलले असून, पोलिसांनी चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.वंदे मातरम् संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या सगळ्यांचे हात काळ्या शाईने बरबटले होते.
कोर्टात वकिलांची फौजआरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या वतीने वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. त्याच्या बचावासाठी वकिलांचा मोठा फौजफाटा न्यायालयात हजर होता.