पुणे: कोयता गॅंगवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. अजूनही अधूनमधून कोयता गॅंगच्या बातम्या येत असतात. अशाप्रकारचे गुन्हे ठेचूनच काढले पाहिजे. आगामी काळात अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्यांवर वेगळ्या प्रकारे कारवाई होताना दिसेल. दहशत कोयता गॅंगची नाही तर पोलिसांचीच असली पाहिजे. पोलिसांची दहशत लोकांवर, दुकानदारांवर नाही तर गुन्हेगारांवर असली पाहिजे त्यासाठी योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. कोयता गॅंगची दहशत मोडून काढण्यासाठी येत्या काळात आणखी काही उपाययोजना केलेल्या असतील. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
फडणवीस म्हणाले, येत्या काळात स्ट्रीट क्राईम कमी होईल. आगामी काळात व्हाइट कॉलर क्राईम, इकॉनमिकल क्राईम, सायबर क्राईम याची संख्या वाढेल. एकेकाळी इकॉनमिकल क्राईमला काही काम नसायचे. आता मात्र सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारही आता सायबर लॉ मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा तयारीत आहे.
काही लोकांचा उद्योगांकडून पैसे वसूल करण्याचा व्यवसाय झाला आहे. अशा लोकांना ठेचून काढायचे आम्ही ठरवले आहे. कोणत्याही माथाडीच्या नावाखाली चकचकीत गाड्यात येऊन पैसे घेऊन जाणे आता चालणार नाही..येत्या काळात पुन्हा मोठ्या संख्येने उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत. अशा वेळी गुंडागर्दी होणार असेल तर हे उद्योग येणार नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे गुंडागर्दी करणाऱ्यांना जबर धडा शिकवला जाईल असा इशारा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.