पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपली कला सादर करता यावी म्हणून ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या फिरोदिया एकांकिका करंडक स्पर्धेला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम होणार असून, येत्या १४ फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरवात होणार आहे.
पुण्यामध्ये फिरोदिया करंडकाला एक मानाचे स्थान आहे. फिरोदियांच्या नावाने आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा १९७४ मध्ये सुरू झाली. या स्पर्धेला तेव्हा हस्तीमलजी फिरोदिया यांनी थिएटर मिळवून दिले होते. म्हणून त्यांच्या नावाने ही स्पर्धा आजतागायत सुरू आहे. फिरोदिया करंडक स्पर्धेचे यंदा ५० वे वर्ष आहे. यंदाची मुख्य स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, तर अंतिम फेरी २४ आणि २५ फेब्रुवारीला होणार आहे. फिरोदिया करंडकच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त २ व ३ मार्चला विशेष कार्यक्रमही आयोजित होणार आहे. स्पर्धेसाठी नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन, अभिनय, नृत्य, संगीत, शिल्पकला एवढे विषय असतात. पण स्पर्धा एकांकिका सादर केल्यामुळे गाजते.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचे करंडकाचे विजेते पाहिले असता त्यामध्ये सर्वाधिक विजेतेपद ‘सीओईपी’ इंजिनिअरिंग कॉलेजने पटकाविले आहेत. इंजिनिअरींगचे विद्यार्थी या स्पर्धेत बाजी मारत करंडक घेत असल्याचे दिसून येते. कला शाखेचे विद्यार्थी मात्र यामध्ये मागे पडतात. या स्पर्धेची उत्सुकता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आहे. त्यामुळे आता येत्या १४ फेब्रुवारीपासून रंगमंच दणाणून जाणार आहे.