पिंपरी : राज्यातील सत्तेत झालेल्या बदलाचा पहिला झटका पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांना बसला आहे. त्यांची राज्य शासनाने मुदतपूर्व बदली केली असून, त्यांच्या जागी अपर आयुक्तपदी विजयकुमार खोराटे यांची वर्णी लागली आहे.
पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (जमीन) या पदावरून वाघ यांची २१ सप्टेंबर २०२१ रोजी पिंपरी महापालिकेच्या अपर आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. प्रतिनियुक्तीवरील त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांच्या स्वाक्षरीने मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी विजयकुमार खोराटे यांचे पिंपरी महापालिका अपर आयुक्त पदावर प्रतिनियुक्तीने बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.
या आदेशात जितेंद्र वाघ यांची पिंपरी पालिकेतील प्रतिनियुक्तीवरील सेवा संपुष्टात आणून त्यांची सेवा मूळ महसूल व वन विभागात वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील सत्तेतील बदल आणि राजकीय स्थित्यतरांचा पहिला फटका वाघ यांना बसल्याचे या बदलीमुळे समोर आले आहे. पुढील काळात आणखी कोणाची बदली होणार, हे पाहावे लागणार आहे.
आयुक्तांच्या बदलीची चर्चा
सत्ताबदलानंतर आयुक्त शेखर सिंह पिंपरी-चिंचवड महापालिकेत रूजू झाले होते. मात्र, ते पालिकेत रूजू झाल्यापासून दबावाखाली काम करत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. राज्यातील सत्तेत झालेल्या बदलानंतर पहिला झटका अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांना बसला आहे. परंतु, त्यांच्या पाठोपाठ लवकरच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचीदेखील बदली होणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.