धनकवडी : धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात एका चहाच्या दुकानात दूध तापत असताना काल अचानक स्फोट झाला. या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला. संतोष हेगडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. मुख्य चौकात भर दुपारी ही घटना घडल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे आग नियंत्रणात आणताना अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
अधिक माहितीनुसार, अहिल्यादेवी चौकातून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूच्या काॅर्नरला सातारा रस्त्याच्या बाजूस चहाचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास एक कामगार चहा बनवत असताना अचानक स्फोट झाला. आग भडकली. शेजारी असलेल्या दोन दुकानांनाही आगीची झळ बसल्याने माेठे नुकसान झाले. कात्रज आणि गंगाधाम अग्निशमन केंद्राचे बंब दाखल झाले. घटनास्थळी पोहोचताच जवानांना आतमध्ये एक कामगार असल्याचे समजताच पाण्याचा मारा करत जवानांनी कामगाराला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी एकुण आठ सिलिंडर हाेते.
नोकरीचा पहिलाच दिवस
कामगार संतोष हेगडे हा त्याच दिवशी कामाला आला होता. त्याचा हा नोकरीचा पहिलाच दिवस होता. परंतु दुर्दैवाने तोच त्याचा शेवटचा दिवस ठरला. चहाच्या दुकानात काम करत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन संतोषचा मृत्यू झाला.