पुणे: दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिलाच पेपर मराठीचा होता आणि तो एकदम छान गेल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. वर्षभर केलेला अभ्यास, सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कृतीपत्रिकेची काठिण्य पातळी कमी झाल्याने परीक्षेचा पहिलाच पेपर सोपा गेला. त्यामुळे पेपर संपल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. आता सर्वांना इंग्रजी विषयाच्या पेपरचे वेध लागल्याचे दिसून आले. सुरुवात तर छान झाली, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (दि. २१)पासून सुरुवात झाली. परीक्षेसाठी १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे. परीक्षेदरम्यान कॉपी आणि तत्सम गैरप्रकार रोखण्यासाठीच्या परीक्षा केंद्रात उपाययोजना केल्या होत्या. विद्यार्थ्यांना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना असल्याने विद्यार्थी १० वाजताच केंद्रावर पोहोचले. दहावी बोर्डाच्या परीक्षेला मुले सामोरे जात असल्यामुळे शहरातील विविध केद्रांवर पालकांनी गर्दी केली होती.
पहिला पेपर असल्याने मुलाला सोडायला अनेकजण कुटुंबासह आले होते. यावेळी परीक्षा केंद्रात कडक बंदोबस्त होता. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांनी सोबत आणलेली बॅग तपासली, तसेच कोणी चप्पल, बुटामध्ये कॉपी लपवली नाही ना, याचीही खात्री करण्यात येत होती. इतर काही साहित्य सापडले, तर ते प्रवेशद्वारावर जमा करण्यात येत होते.
सकाळच्या सत्रात प्रथम भाषा मराठीसह हिंदी, उर्दू, भाषेचा पेपर होता. पहिला पेपर मराठीचा असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर काहीसे दडपण असल्याचे चित्र होते. प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर सोप्या कृतीमुळे पेपर सोडविणे अधिक सहज झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक नसल्याचेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. पहिला पेपर सोपा गेल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी आनंदी चेहऱ्याने परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना दिसले.
विद्यार्थ्यांऐवजी पालकच चिंतेत
बारावीच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेचा सराव झालेला असतो. त्यामुळे पालकही बिनधास्त असतात. मात्र, दहावीच्या परीक्षेला पालक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यास येतात. पेपर होईपर्यंत परीक्षा केंद्रावरच बसून राहतात. विद्यार्थी वर्गात प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, परीक्षा केंद्रावर बसलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण स्पष्टपणे जाणवत असल्याचे दिसून येते.