पुणे: सध्या समाजामध्ये जातीपातीवरून वाद सुरू आहेत. त्यामुळे सर्वधमीर्य एकोपा राहण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढण्यासाठी सर्व धर्मीय ऐक्य दिंडी महत्त्वाची ठरणार आहे. पालखी सोहळा रविवारी पुण्यात येत असून, सोमवारी ही ऐक्याची दिंडी पंढरीकडे निघणार आहे.
पंढरपूर वारीनिमित्त उद्या पुण्यात सर्व धर्मीय ऐक्य दिंडी आयोजित करण्यात आली आहे. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक,रिझवानी मस्जिद ट्रस्ट,सुफी वारकरी विचारमंच आणि साखळीपीर तालीम तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या विद्यमाने दि.१ जुलै रोजी सर्व धर्मीय ऐक्य दिंडीचे आयोजन सकाळी साडे दहा वाजता करण्यात आले आहे.साखळीपीर तालीम(नाना पेठ) येथे सर्वधर्मीय धर्म गुरु,'डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी 'चे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार,साखळीपीर तालीमचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार असून अंगरशा बाबा दर्गा मार्गे रिझवानी मस्जिद (गंज पेठ) येथे समारोप होणार आहे.
रिझवानी मस्जिद ट्रस्ट चे विश्वस्त अंजुम भाई, सुफी वारकरी विचार मंचचे अध्यक्ष मशकूर अहमद शेख, सचिव उमर शरीफ शेख, आझम ट्रस्टचे सचिव अब्दुल वहाब शेख यांनी ही माहिती दिली. सहभागी वारकऱ्यांना व्हेज बिर्याणी, शीरखुर्मा वाटप करण्यात येणार आहे. 'डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी'च्या वतीने वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात येणार आहे. दिंडीचे हे पाचवे वर्ष आहे.